मुंबई- महाराष्ट्रात भाजपाविरोधात पर्याय म्हणून स्थापन करण्यात आलेली महाविकास आघाडी सध्या डळमळीत झाली आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांसह जाण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने मविआच्या अस्तित्वाबद्दल शंका उपस्थित झाली आहे. या परिस्थितीत काँग्रेस एकटा पडू शकतो हे लक्षात घेऊन काँग्रेसने हालचाली सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवाव्यात असा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांना भेटले. त्यानंतर त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोनच दिवसांपूर्वी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीत शरद पवार यांच्याशी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाविषयी चर्चा झाली, असे सकपाळ यांनी जाहीरपणे म्हटले असले तरी ही भेट मविआच्या भवितव्याबद्दलच होती, हे उघड गुपित होते. या भेटीच्या नंतर उबाठाचे आमदार सचिन अहिर हेदेखील शरद पवारांच्या भेटीला गेले होते.
आज मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, आगामी निवडणुकांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील. त्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. उबाठाचीही त्यांच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांशी चर्चा करीत आहे. जेव्हा निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागेल तेव्हा अंतिम निर्णय घेतला जाईल.
ते पुढे म्हणाले की, भाजपा महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत. ही एक सदिच्छा भेट होती. या भेटीत इंडिया आणि महाविकास आघाडीच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार आजही महत्त्वाचा आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी देवांचा धर्म व धर्माची देवळे पुस्तकात महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे हे सांगितलेले आहे. महाराष्ट्र धर्म जगला तर देश जगेल. पण आज भाजपा धर्म बुडवायला निघाला आहे. त्यामुळे आज संघर्षाची वेळ आहे. लोकशाहीच्या विरोधात असलेले भाजपाने कारस्थान केले आहे. लोकशाही आणि संविधान व शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढ्यात शिवसेना व काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र कसे राहतील यावर चर्चा झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल बोलताना सकपाळ म्हणाले की, या निवडणुका कशा प्रकारे लढल्या पाहिजेत, याबाबतीत दोन्ही पक्षांच्या आपापल्या भूमिका आहेत. निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर पक्षाने स्थानिक नेतृत्वाला आघाडीचे अधिकार दिले असल्याची माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली. त्यांनी त्याचे स्वागत केले. तेदेखील या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या स्थानिक पदाधिकांऱ्यांशी बोलणार आहेत. या निवडणुकीची अधिसूचना निघाल्यावर मित्रपक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाबाबत अद्यापी घोषणा झालेली नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलता येणार नाही. लोकशाही वाचवणे आणि संविधानाचे संवर्धन-संरक्षण आणि एकंदरीत महाराष्ट्र धर्म वाचवणे या विचारासोबत जे असतील, ते आमच्यासोबत येतील, अशी आमची मूलभूत भूमिका आहे.
’इंडिया’लाही घरघर
मविआप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी एकत्र येऊन राष्ट्र पातळीवर स्थापन केलेल्या इंडिया आघाडीलाही घरघर लागली असून, सध्या तिचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे. काँग्रेसचे नेते पी. चिंदबरम इंडियाविषयी चिंता व्यक्त करताना म्हणाले की, इंडिया आघाडी पूर्णपणे अबाधित राहिली तर आनंद होईल. मात्र, इंडिया आघाडीचे भवितव्य तितके उज्ज्वल नाही. आघाडी अजूनही अबाधित आहे, याचीच मला खात्री नाही.
