माझ्या नसांत रक्त नाही! गरम सिंदूर वाहत आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी बिकानेरमध्ये भावुक


बिकानेर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच राजस्थानमधील बिकानेर येथे आले होते. त्यांनी पाकिस्तान सीमेपासून केवळ 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या पलाना गावी 40 मिनिटे भाषण केले. यावेळी ते पहलगामच्या हल्ल्याच्या आठवणीने भावुक झाले. ते म्हणाले की, पाकिस्तान एक गोष्ट विसरला आहे की, आता भारतमातेचे सेवक मोदी छाती वर करून उभे आहेत. मोदींचे डोके शांत आहे, पण मोदींचे रक्त गरम आहे. आता तर मोदींच्या नसांमध्ये रक्त नाही, तर गरम सिंदूर वाहत आहे.
पंतप्रधान बिकानेरच्या नल एअरबेसवर आले. हाच एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मोदी येथून करणी माता मंदिरात गेले. तिथे त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर ते बिकानेरच्या पलाना गावात पोहोचले. इथे झालेल्या जाहीर सभेत मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात राम-राम म्हणत केली. ते म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी बालाकोटमध्ये हवाई हल्ला झाला होता. त्यानंतर माझी पहिली जाहीर सभा राजस्थानमध्ये झाली. या शूर भूमीच्या तपश्चर्येमुळेच असा योगायोग पुन्हा घडत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर बिकानेरमध्ये सभा होत आहे. आमच्या भगिनींचे कुंकू पुसले, त्या गोळ्या पहलगाममध्ये झाडल्या, पण त्या गोळ्या 140 कोटी भारतीयांच्या छातीवर लागल्या. त्यानंतर देशवासीयांनी एकत्र येत संकल्प केला की, दहशतवाद संपवून टाकू. त्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देऊ. आज तुमच्या आशीर्वादाने आणि देशाच्या लष्कराच्या शौर्याने आपण ती प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने सैन्याला प्रतिकाराचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. तिन्ही सैन्यदलांनी मिळून पाकिस्तानच्या विरोधात असा चक्रव्यूह तयार केला की, त्यांना गुडघे टेकावे लागले. 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केवळ 22 मिनिटांत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. सिंदूर तोफगोळा बनते, तेव्हा काय होते हे जगाने पाहिले. ज्यांनी आपल्या बहिणींचे सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला, त्यांना मातीत गाडण्यात आले. जे भारताच्या शांततेला कमजोरी समजत होते ते ढिगाऱ्यांखाली गाडले गेले. ऑपरेशन सिंदूर हे संतापातून नव्हे, तर न्यायाच्या भावनेतून राबवण्यात आले आहे. भारत अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरत नाही.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाचा मुकाबला करण्याची तीन सूत्र निश्चित केली. पहिले असे की, भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. त्याची वेळ आपले लष्कर निश्चित करेल आणि अटीदेखील आपणच ठरवलेल्या असतील. दुसरे म्हणजे अण्वस्त्रांच्या धमक्यांना भारत घाबरत नाही. तिसरी गोष्ट अशी की, दहशतवाद्यांना पोसणारे सरकार आणि दहशतवाद्यांचे सूत्रधार यांना वेगळे मानले जाणार नाही. पाकिस्तानला थेट युद्धात कधीही यश आले नाही म्हणून त्यांनी वर्षानुवर्षे दहशतवादाचे हत्यार वापरले.
निर्दोष लोकांवर हल्ले करून भारतात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली नाही की, भारत आता बदलला आहे. भारतात आता मोदी आहे. प्रत्येक हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकती करावी लागेल. पाकिस्तानच्या लष्कराला आणि अर्थव्यवस्थेलाही परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तानने नल एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. उलट इथून जवळच असलेले पाकिस्तानचे राहिमयार खान एअरबेस आयसीयूमध्ये आहे. तो पुन्हा कधी सुरू होईल, ते ठाऊक नाही. आता पाकिस्तानशी व्यापार आणि चर्चा होणार नाही. जर चर्चा झालीच, तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरबद्दल होईल.
महाराष्ट्रात 15 स्थानके
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित देशातील 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 15 स्थानकांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील परळ स्थानकाचाही समावेश आहे. या स्थानकांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिकानेर राजस्थान येथून ऑनलाईन उपस्थितीत झाला. यानिमित्त मध्य रेल्वेतर्फे मुंबईतील पुनर्विकसित परळ स्टेशन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीणा उपस्थित होते. 103 रेल्वे स्थानकांच्या उद्घाटनाबरोबर मोदी यांनी बिकानेर-वांद्रे ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. यासोबत 26 हजार कोटी रुपयांच्या इतर विकासकामांचे पायाभरणी आणि उद्घाटनही केले.
ऑपरेशन सिंदूरवर मोदींची कविता
जो सिंदूर मिटाने निकले थे,
उन्हें मिट्टी में मिलाया है|
जो हिंदुस्तान का लहू बहाते थे,
आज कतरे-कतरे का हिसाब चुकाया है|
जो सोचते थे भारत चुप रहेगा,
आज वो घरों में डूब-डूबकर पड़े हैं|
जो अपने हथियारों पर घमंड करते थे,
आज वो मलबे के ढेर में दबे हैं|
ये शोध-प्रतिशोध का खेल नहीं,
ये न्याय का नया स्वरूप है|
ये ऑपरेशन सिंदूर है, ये सिर्फ आक्रोश नहीं है,
ये समर्थ भारत का रौद्ररूप है|
ये भारत का नया स्वरूप है|
पहले घर में घुसकर किया था वार,
अब सीधा सीने पर किया प्रहार है|
आतंक का फन कुचलने की यही नीति है,
यही रीति है|

Share:

More Posts