मुंबई- शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar group)आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधिमंडळ सभागृहात बसून मोबाईलवर रमी (Rummy) खेळतानाचा व्हिडीओ एक्स (X) वर शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. यावर कोकाटे यांनी मी युट्युब बघत असताना रमी गेमची आलेली जाहिरात स्किप करत होतो, असे स्पष्टीकरण दिले होते.मात्र आज आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांचे मोबाईलवर (Mobile) रमी गेम खेळतानाचे आणखी दोन व्हिडीओ पोस्ट (Video post) करत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जाहिरात स्किप (ad Skip) करत नव्हते तर ते जंगली रमीच खेळत होते असा दावा केला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आव्हाड एक्स पोस्ट करत म्हणाले की, एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे, प्रश्नोत्तराचा तास सुरू होता आणि दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन जुगार खेळण्यात व्यस्त होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाला. त्या व्हिडिओवर कोकाटे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मी जंगली रमी खेळतच नव्हतो तर जाहिरात बघत होतो. पण आता मी दोन व्हिडिओ देत आहे, दोन्ही नीट बघा. कुठला पत्ता कुठे व कसा हलवला आहे, हे स्पष्ट दिसेल. माणिकराव कोकाटे स्वतः त्यांच्या बोटांनी ऑनलाईन जुगाराचे पत्ते सरकवत असल्याचा स्पष्ट पुरावा यात दिसतो. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा, मी मागाल तेवढे पुरावे देतो. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकला आहे.
कोकाटेंचे मंत्रिपद जाणार?
कोकाटे यांच्याकडून जे वर्तन झाले ते अत्यंत अयोग्य झाले, पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल असे सांगत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी कोकाटे यांचा राजीनामा होणार असल्याचेच संकेत दिले . तटकरे म्हणाले की, विधिमंडळात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ ही अतिशय गंभीर बाब आहे. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांनी असे वागणे योग्य नाही. त्यांच्याकडून जे वर्तन झाले ते अत्यंत अयोग्य झाले, पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल. त्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार अशी चर्चा रंगली आहे.