मुंबई – शेकापचे (PWP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पाठोपाठ आता प्रहार (Prahar) जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थ (Shivatirth) या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली आणि मराठवाड्यातून निघणाऱ्या कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसेला निमंत्रण देण्यात आले . आम्ही अनेकदा मुंबई(Mumbai) बंद होताना पाहिली आहे. आता एक दिवस ती शेतकऱ्यासाठी बंद राहायला हवी, अशी मागणी यावेळी कडूंनी राज ठाकरेंकडे केली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात राज ठाकरेंचे राजकीय लागेबांधे बदलत असल्याची चर्चा रंगली आहे.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंनी म्हटले की, आम्ही राज ठाकरेंना यवतमाळमध्ये होणाऱ्या कर्जमाफी यात्रेला आमंत्रित केले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, आगामी आंदोलनाच्या दिशादर्शक मागण्यांवर आणि धोरणांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी असलेले हे आंदोलन केवळ बच्चू कडू नावापुरते न ठेवता हे शेतकऱ्यांसाठी असलेले आंदोलन म्हणून कसे पुढे जाईल, असा आमचा प्रयत्न आहे. मी मोठे होणे हा महत्त्वाचा विषय नाही. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. सरकार त्यांची टिंगल करत आहे, हे अतिशय चुकीचे आहे. दुष्काळ पडला तर कर्जमाफी जाहीर करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. म्हणजे दुष्काळ पडायची वाट शेतकऱ्यांनी पाहावी का? शेतमालाला भाव मिळत नाही, हे दुष्काळापेक्षा जास्त मोठे नुकसान आहे. मागील दोन वर्षांपासून भाव मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. हा विषय फडणवीस यांच्या लक्षात यावा यासाठी आंदोलन सुरू आहे.
या भेटीवेळी मनसे नेते बाळा नांदगावकर हेही उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी आम्हाला पाठवले होते. चक्काजाम आंदोलनालाही आमचा पाठिंबा होता. शेतकऱ्यांबाबत राज ठाकरे संवेदनशील आहेत.