मुंबई – विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या राडा प्रकरणात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी विधिमंडळाकडे गोपनीय अहवाल (confidential report )सदर केला आहे.विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधान भवनाच्या (Vidhan Bhavan)लॉबीमध्ये शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad)आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar)यांचे समर्थकांमध्ये राडा झाला होता.
या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अनेक नेत्यांनी यामुळे विधिमंडळाची प्रतिष्ठा धोक्यात आल्याची टिप्पणी केली होती. या प्रकारानंतर चौकशीची जबाबदारी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे (Marine Drive Police)सोपवण्यात आली होती. पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल केले होते.
त्यानंतर चौकशी (investigation) दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी उपलब्ध असलेल्या साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित कार्यकर्त्यांची माहिती तपासून अहवाल तयार केला आणि हा सविस्तर गोपनीय अहवाल तयार करून तो विधिमंडळाकडे सादर केला आहे. या गोपनीय अहवालात संपूर्ण घटना आणि निष्कर्ष सविस्तर नमूद करण्यात आले आहेत, अशी माहिती आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात, कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.