India vs Pakistan -आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup final) आज दुबईला भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम क्रिकेट सामना रंगणार आहे . या स्पर्धेतील पहिल्या भारत-पाक सामन्यावेळी उबाठाने एकदम आक्रमक भूमिका घेत हा सामना पाहू नका, या सामन्यावर बहिष्कार (Boycott)घाला अशा गर्जना केल्या. मात्र त्या सामन्यानंतर दुसऱ्यांदा भारत-पाक सामना झाला तेव्हा उबाठाने बहिष्काराचा एकही शब्द उच्चारला नाही. उबाठा (UBT)शांत राहिला. मात्र आता तिसऱ्या सामन्यावेळी उबाठाला पुन्हा बहिष्कार घालण्याची आठवण झाली आहे. इतकेच नव्हे तर सामन्याच्या एक दिवस आधी उबाठाने या सामन्याला स्पॉन्सर करू नका, असे अजब आवाहन केले आहे. त्यामुळे उबाठाचा तर्क आणि भूमिका याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या स्पर्धेतील आधीच्या दोन्ही सामन्यांत भारताने पाकिस्तानला धूळ चारली असल्यामुळे उद्याचा तिसरा व अंतिम सामनाही भारत जिंकेल, असा क्रिकेटप्रेमींचा अंदाज आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ 41 वर्षांनी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, भारताने या स्पर्धेतील सगळे सामने जिंकले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी खेळू नये, अशी मागणी ही स्पर्धा सुरू झाल्यापासून केली जात आहे. उबाठा पक्षाने ही मागणी सर्वप्रथम केल्यावर इंडिया आघाडीतील काही पक्षांनी तिला पाठिंबा देत आंदोलन केले. मात्र, बीसीसीआयने (BCCI)आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून माघार घेता येत नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे भारत साखळी आणि अव्वल चार फेरीतील असे दोन सामने पाकिस्तानशी खेळला.
मात्र, आयसीसी प्रमुख जय शहा (Jay Shah)यांच्यासह भारतीय क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी या सामन्याला उपस्थित राहिले नाहीत. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी सामना संपल्यानंतर हस्तांदोलन केले नाही. त्यामुळेही वाद झाला. पाकिस्तानने याची अधिकृत तक्रार आयसीसीकडे केली. परिणामी भारतीय संघाला ताकीद देण्यात आली. तर पाकिस्तानी फलंदाज साहेबजादा फरहान (Pakistani batsman Sahibzada Farhan)याने अर्धशतक फटकावल्यावर बॅट हवेत उंचावताना बंदुकीतून गोळ्या झाडल्यासारखी ॲक्शन करून भारतीय प्रेक्षकांना खिजवले. तर गोलंदाज हारिस रौफ याने राफेल विमान कोसळत असल्याचे हावभाव केले. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांच्या संतापाचा पुन्हा भडका उडाला. मात्र, पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यावेळी भारतीयांचा विरोध काहीसा मावळला होता. उबाठानेही दुसऱ्या सामन्यावर बहिष्काराची मागणी केली नव्हती.
आज मात्र उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत भारत-पाकिस्तान सामन्यावरून प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, उद्या पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना होत आहे, हा निर्लज्जपणा झाला. जो देश आपल्या देशात अतिरेकी घुसवत आहे त्यांच्याशी क्रिकेट खेळणे हे देशभक्तीचे ढोंग आहे. आमचा या सामन्याला विरोध आहे. सर्वांनी उद्याच्या सामन्यावर बहिष्कार घाला. माझे आणखी एक आवाहन आहे की, जे जाहिरातदार, प्रायोजक आहेत यांनीही थोडी देशभक्ती दाखवावी. त्यांना विनंती आहे की, तुमचे उत्पादन भारतात होते. भारतच तुमची बाजारपेठ आहे. त्यामुळे या देशाच्या शत्रूविरोधातील सामन्याला कुठलीही स्पॉन्सरशीप देऊ नका. अर्थात स्पॉन्सर कोण हे आधी ठरत असल्याने या आवाहनाला आता प्रतिसाद मिळण्याची शक्यताही नाही.
भारत 12 वेळा आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यात 8 वेळा भारताने हा चषक जिंकला आहे. भारत-पाकिस्तान हे दोन्ही आतापर्यंत 10 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात 7 वेळा पाकिस्तानने बाजी मारली आहे, तर तीन वेळा भारताने विजय मिळवला आहे. उद्याच्या सामन्यात भारताचे सलामीवीर आणि पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज यांच्यात लढत होईल, असे म्हटले जात आहे. सलामीवीर अभिषेक शर्माने खणखणीत फलंदाजी करत या स्पर्धेत सलग तीन अर्धशतके ठोकली आहेत. तर गोलंदाजीत कुलदीप यादवने 13 बळी टिपून चमकदार कामगिरी केली आहे. पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना भारताने सहज जिंकला होता. दुसरा सामना काहीसा चुरशीचा झाला होता. अव्वल चार फेरीत भारताविरुद्ध पराभूत झाल्यावर पाकिस्तानने आपली कामगिरी सुधारली आहे. त्यामुळे उद्याचा सामना अटीतटीचा होईल, असा अंदाज आहे. अंतिम सामन्यापूर्वी भारताचे अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या (Hardik Pandya)आणि तिलक वर्मा हे तीन खेळाडू जखमी झाले आहेत.
ऑलराऊंडर हार्दिक पंड्या हा श्रीलंकेविरोधातील सामन्यात पहिले षटक टाकल्यानंतर मैदानाबाहेर गेला. अभिषेक शर्मा याच्या हाताचे दुखणे वाढले आहे. त्यानेही श्रीलंकेविरोधातील सामन्यावेळी क्षेत्ररक्षण केले नाही. तर तिलक वर्माला स्नायूंच्या दुखापतीमुळे त्रास असह्य झाला आहे. श्रीलंकेचा सामना संपल्यानंतर कर्णधार यादव याने ही माहिती दिली. त्यामुळे भारतीय गोटात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.
हे देखील वाचा –
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मुंबईत नवीन ६ बोगदे बांधणार
चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आलेला शाह बानो खटला नेमका काय आहे? जाणून घ्या