Home / राजकीय / MNS Join MVA? मनसे मविआमध्ये येणार? शरद पवार सकारात्मक

MNS Join MVA? मनसे मविआमध्ये येणार? शरद पवार सकारात्मक

MNS Join MVA?- आगामी मुंबई महापालिका निवडणूक (Elections) महायुती एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता राज ठाकरेंसह (Raj Thackeray) महाविकास...

By: Team Navakal
MVA Meeting
Social + WhatsApp CTA

MNS Join MVA?- आगामी मुंबई महापालिका निवडणूक (Elections) महायुती एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता राज ठाकरेंसह (Raj Thackeray) महाविकास आघाडीचीही (Maha Vikas Aghadi) वज्रमूठ बांधण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी स्वतः मविआचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला असून ते दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे उद्धव ठाकरेही काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करत असल्याची माहिती आहे.

मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने गेल्या आठवड्यात काँग्रेसने (Congress) बैठक घेऊन महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काल मुंबई काँग्रेस अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी शिष्टमंडळासह सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवण्याबद्दल इच्छा व्यक्त केली. पण पवारांनी आठवडाभराने सांगू, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आज दिवसभर पुन्हा मनसे-मविआ एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली.

स्वतः शरद पवार हे मविआ आणि ठाकरे बंधू (Thackeray brothers)अशी गोळाबेरीज करून निवडणूक लढवण्याच्या बाजूने आहेत. २०१९ मध्येही काँग्रेस शिवसेनेसोबत जाण्यास तयार नव्हती, तेव्हा पवारांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेत मविआ स्थापनेची राजकीय भूमिका स्पष्ट केली होती. तसेच पालिका निवडणुका एकत्र लढवण्यासाठी पवार आग्रही आहेत. काल काँग्रेस नेत्यांच्या भेटीतही पवारांनी (Sharad Pawar)भाजपाला रोखण्यासाठी मुंबईतही एकत्रितपणे निवडणुकीत उतरावे, अशी भूमिका स्पष्ट केली. मतदार यादीच्या घोळावर आणि मतचोरीवर एकत्रित येऊन मोर्चा काढता, मग निवडणूक का वेगळी लढवता, असा सवालच पवारांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला विचारला. विरोधी मतांची फाटाफूट झाल्यास ती गोष्ट एकत्र लढत असलेल्या महायुतीच्या पथ्यावर पडणारी आहे. हेच मतविभाजन रोखण्यासाठी पवार विरोधकांची वज्रमूठ अधिक घट्ट करण्याकरता आग्रही असल्याचे समजते.

मुंबईची निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शिवसेनेतील फाटाफुटीत पालिकेची सत्ता महायुतीकडे गेल्यास ठाकरेंसाठी पुढचा काळ आणखी बिकट होऊ शकतो. त्यामुळे ठाकरेंनीही पुन्हा एकदा पालिका ताब्यात घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ठाकरेंनी जागावाटपाची जबाबदारी असलेल्या आपल्या पक्षाच्या एका बड्या नेत्यामार्फत खासदार वर्षा गायकवाड(MP Varsha Gaikwad)यांच्याशीही चर्चा सुरू केल्याची माहिती आहे.

या सर्व घडामोडींवर काँग्रेस नेत्या गायकवाड यांनी मात्र आजही समविचारी पक्षांसोबतच लढण्याची भूमिका स्पष्ट केली. मनसेचा उल्लेख न करता पुढे म्हणाल्या की, आम्ही काही लोकांसोबत जाऊ शकत नाही आणि ही भूमिका आम्ही दोन महिन्यांपासून सातत्याने सांगत आहोत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा समविचारी पक्ष आहे आणि त्यांच्यासोबत आघाडी होण्याची शक्यता आहे. मात्र, पवारांची कोणाशी चर्चा चालू आहे, हे मला माहीत नाही. आमच्याशी याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.

मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले की, मनसे हा महाविकास आघाडीचा भाग नाही. उद्धव ठाकरे काय बोलतात किंवा वर्षा गायकवाड शरद पवारांशी काय बोलतात किंवा पवार साहेब मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला काहीही देणे-घेणे नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष असून पक्षाचे सर्व निर्णय हे राज ठाकरे घेतात.


हे देखील वाचा – 

नवले पूल नव्याने उभारणार; मंत्री उदय सामंतांची घोषणा

 साम-दाम-दंड-भेदाने निवडणुका बिनविरोध ; रोहित पवारांचा आरोप

 मुंबईत दिवसाढवळ्या खुणांचा थरार! कांदिवलीत बिल्डरवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या

Web Title:
संबंधित बातम्या