Home / राजकीय / Nirav Modi : नीरव मोदीची चौकशी होणार नाही; भारताने ब्रिटनला हमीपत्रच दिले

Nirav Modi : नीरव मोदीची चौकशी होणार नाही; भारताने ब्रिटनला हमीपत्रच दिले

Nirav Modi – कोट्यवधी रुपयांचा पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) घोटाळा करून भारतातून पळून गेलेला मुख्य आरोपी नीरव मोदी...

By: Team Navakal
Nirav Modi  

Nirav Modi  – कोट्यवधी रुपयांचा पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) घोटाळा करून भारतातून पळून गेलेला मुख्य आरोपी नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्ये आहे. त्याला भारताच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, यासाठी भारताने ब्रिटनच्या कायद्यानुसार तेथील न्यायालयाने मागितलेले जे हमीपत्र ब्रिटनला दिले आहे, त्यानुसार मोदीला भारतात आणल्यावर त्याची कोणत्याही तपास संस्थेकडून चौकशी (Investigating agency)केली जाणार नाही. त्याच्यावर फक्त आर्थिक फसवणुकीचा खटला चालवला जाणार आहे. त्यामुळे तपास करून मोदीवर कुठलेही नवे गुन्हे दाखल करता येणार नाहीत. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था (Central Bureau of Investigation), अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate), गंभीर गुन्हे तपास विभाग (SFIO), सीमाशुल्क विभाग (कस्टम्स) आणि आयकर विभाग (IT) या पाच भारतीय संस्थांच्या वतीने संयुक्तपणे हे हमीपत्र ब्रिटनला देण्यात आले आहे. त्यामध्ये  नीरव मोदीला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातील 12 क्रमांकाच्या बराकीत ठेवण्यात येईल. ती सामान्य कैद्यांपासून वेगळी आणि युरोपियन मानांकनानुसार सोयीसुविधा असलेली आहे. गुन्हेगार प्रत्यार्पण प्रक्रियेसाठी करण्यात आलेल्या अर्जात त्याच्यावर ज्या आर्थिक गुन्ह्याचा आरोप आहे त्याबद्दलचाच खटला चालवला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. हे हमीपत्र मिळताच सर्वप्रथम ब्रिटनने नीरव मोदीची सर्व प्रक्रिया नव्याने सुरू करण्याची याचिका फेटाळावी, अशी अपेक्षाही हमीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. ही सुनावणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.


नीरव मोदी याच्याविरुध्द भारतात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा सीबीआयने दाखल केला आहे. तो मोदीने आपला मामा या खटल्यातील दुसरा आरोपी मेहुल चोक्सी याच्या मदतीने पंजाब नॅशनल बँकेची 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दलचा आहे. या रकमेपैकी 6,498.20 कोटी रुपयांचा अपहार मोदीने केला आहे, असा आरोप सीबीआयने ठेवला आहे. दुसरा गुन्हा ईडीने नोंदविला असून, तो मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (Money Laundering Act) दाखल करण्यात आलेला याच फसवणुकीसंबंधीचा आहे. तिसरा गुन्हा पुराव्यांशी छेडछाड करणे आणि सीबीआयने सादर केलेल्या साक्षीदारांना फितवण्याचा प्रयत्न केल्याचा आहे. तत्पूर्वी 9 नोव्हेंबर 2022 रोजी ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने (UK High Court) नीरव मोदीचे अंतिम अपिल फेटाळत त्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केले होते. त्याचवेळी प्रत्यार्पणाला ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यास परवानगी देण्याची विनंती उच्च न्यायालयाने धुडकावली होती.


हे देखील वाचा –

दिवाळीत ग्राहकांना स्वस्त कांदा मिळणार

जोगेश्वरी मेट्रो स्थानकखालील खड्ड्यात तरुणाचा पाय अडकला

पंतप्रधान मोदींच्या गुजरातचा शिक्षण दर्जा सर्वात वाईट

Web Title:
संबंधित बातम्या