मुंबई- सरकार (Government) मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारने कितीही रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला तरी सरकारची प्रतिमा कलंकित झाली आहे. महाराष्ट्राला डाग लागला आहे. अशा प्रकारे मंत्रिमंडळातील पत्ते पिसल्यामुळे तो डाग पुसला जाणार नाही. त्यामुळे मंत्र्यांना (Minister) जावेच लागेल, असे मी खात्रीने सांगत आहे, असे आज उबाठा (UBT) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सुनावले.
राऊत पुढे म्हणाले की, वसईच्या (Vasai) आयुक्तांवर पडलेली धाड हे १ हजार कोटींचे प्रकरण आहे. त्यातदेखील एका मंत्र्याला जावे लागेल. तसेच आता जे नवीन क्रीडामंत्री (Sports Minister) आहेत, त्यांना योग्य खाते मिळाले आहे. मात्र ही तात्पुरती व्यवस्था आहे. प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कोकाटे ((Manikrao Kokate) यांच्यावर झालेली कारवाई ही केवळ थातूरमातूर आहे. वास्तविक आरोपी मंत्री आणि त्यांचे नेते आपापल्या माणसांना वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. पण याचा जनतेच्या आणि विरोधकांच्या मतांवर काहीही परिणाम होणार नाही. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर या सर्व प्रकरणाचे ओझे झाले आहे. त्यांनी स्वत: दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शहा यांना सांगितले की या लोकांबरोबर काम करणे आता अवघड झाले आहे. या प्रकरणांमुळे सरकार आणि राज्याची बदनामी होत आहे. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागेल.