मुंबई – बीड शहरातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये शिक्षकाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दोन शिक्षकांविरोधात पॉक्सो कायद्यानुसार बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली. या घटनेची दखल घेत विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमदार चेतन तुपे यांनी ही बीडमधील अतिशय गंभीर घटना सभागृहात उपस्थित केली. कोचिंग क्लासेसमध्ये मुलींचे लैंगिक शोषण झाले आहे. एका पीडित मुलीने आणि तिच्या आईने धाडस करून तक्रार दाखल केली. त्यानंतर ही वस्तुस्थिती समोर आली. हा प्रकार अनेक मुलींसोबत घडल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती व संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने चौकशीसाठी वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एक एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाच्या आरोपींवर कुणाचा वरदहस्त होता का, राजकीय किंवा सामाजिक दबावाचा प्रयत्न झाला का, याचा तपास केला जाणार आहे. अशा नराधमांना कठोर शिक्षा केली जाईल आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही. पीडित मुलींना योग्य न्याय मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी एसआयटी स्थापनेचे स्वागत करत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच या प्रकरणातील आरोपी तसेच त्यांना मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.