मुंबई – अजित पवार गटाचे आमदार आणि माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांच्या कार्यकाळात कृषी विभागात १६९ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas)यांनी केला आहे. या प्रकरणी लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे धस यांनी सांगितले.
आज सुरेश धस यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी (Agriculture Department, Vikaschandra Rastogi)यांना पत्र लिहून कृषी खात्यातील कथित घोटाळ्याचा तपशीलवार अहवाल मागितला. त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Deputy Chief Minister Ajit Pawar) मंत्रालयात भेट घेतली आणि एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली.
या भेटीनंतर सुरेश धस म्हणाले की, धनंजय मुंडे यांना एका खरेदी प्रकरणात न्यायालयाने क्लीन चिट (clean chit)दिली असेल पण त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनीच ७८ बनावट कंपन्या स्थापन करून खतखरेदी करत घोटाळा केला. कृषी खात्याच्या बैठका आका म्हणजेच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Valmik Karad)हाच घेत होता. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. मी कृषि खात्याचे प्रधान सचिव (Agriculture Principal Secretary) विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहून अहवाल मागितला आहे. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही. पण या प्रकरणातील आर्थिक अनियमिततेविषयी काही लोक न्यायालयात जाणार आहेत. मीदेखील कागदपत्रांची तपासणी करून न्यायालयात याचिका दाखल करेन.