बीड – बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना वाईटावर टपला होता. त्याला मुंडे यांना संपवून परळीत पोटनिवडणूक घ्यायची होती असा दावा आज कराडचा जुना सहकारी विजयसिंह बाळा बांगर याने केला. या दाव्यामुळे बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
विजयसिंह बाळा बांगर याने काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड, त्यांचा मुलगा श्री कराड आणि काही साथीदारांनी महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बांगर याने महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आणला. त्यांच्या मृतदेहाचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. या आरोपानंतर काल वाल्मिक कराड व बाळा बांगरच्या पत्नीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात पत्नीने त्याच्यावर अनैतिक संबंध, मारहाणीचे आरोप करत अनेक वैयक्तिक गोष्टी उघड केल्या आहेत. या क्लिपमध्ये बांगरची पत्नी म्हणाली की, विजयसिंह बांगर यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांकडून छळ केला जात आहे., त्यांची आई आणि बहिण मला मारहाण करतात. माझ्या पोटात बाळ असताना त्यांनी मला त्यांनी ते खाली करायला सांगितले. बाळ आता दोन वर्षाचा आहे. पण त्यांनी कसलीही मदत केलेली नाही. त्यांनी मला घराबाहेर काढले. लग्नाच्या दिवशी त्यांनी घरच्यांकडून पाच लाख रूपये घेतले.
विजयसिंह बांगर म्हणाला की, माझा परळी पोलिसांवर फार विश्वास नाही. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या वाईटावर होता. मुंडे यांना संपवून कराडला परळीत पोटनिवडणूक घ्यायची होती. एवढेच नाही तर मुंडे यांचा स्वीय सहायक प्रशांत जोशी यांना मारण्याचा कटही त्याने रचला होता. वाल्मिक कराडने माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनाही त्रास दिला. या प्रकरणात तोंड न उघडण्यासाठी माझ्यावर दबाव होता. पण या प्रकरणात जबाब दिल्याचे त्यांना माहिती नव्हते. मी कुणालाही घाबरणार नाही.कराडने परळीला कीड लावली. मी स्वतः फरार होतो. त्यामुळे मला हे सर्व उघडकीस आणण्यास विलंब झाला. प्रशासनाने कराड व त्याच्या गँगला अभय दिले. मात्र आता तो कधीच तुरुंगातून बाहेर येणार नाही.
तर रेकॉर्डिंग बाबत बाळा बांगर म्हणाले की, मी माझ्या पत्नीकडे याविषयी विचारणा केली. तिने ही रेकॉर्डिंग व्हायरल केली नाही. आता या रेकॉर्डिंगचे सीडीआर काढण्यासाठी मी स्वतः उपोषणाला बसणार आहे. त्या क्लिपचे सत्य शोधण्यासाठी मी स्वतः उपोषणाला बसणार आहे. कराडच्या टोळीत काही महिला सक्रिय आहेत. माझ्याकडे कराडच्या गुन्हेगारी कारवायांचे सर्व पुरावे आहेत. आता त्याची गँग तुरुंगातून बाहेर येणार नाही, यासाठी मी लढा देणार आहे.