बीड- मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा बांधवांसह मुंबईला कूच केली होती, त्याचप्रमाणे आता धनगर समाजाच्या बांधवांनीदेखील आरक्षणाच्या मागणीसाठी १७ फेब्रुवारीला मुंबईच्या दिशेने रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे. बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर काल धनगर समाजाच्या इशारा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांनी सरकारला इशारा दिला.
बीडमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी काल इशारा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या इशारा मेळाव्याला धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्यामध्ये धनगर आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. यानुसार १७ फेब्रुवारीला आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडी येथून मेंढ्यासह धनगर बांधव मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. या आंदोलनात ५० लाख धनगर बांधव सहभागी होणार आहेत. मुंबईत आल्यानंतर हे धनगर बांधव २२ फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत, असा निर्धार बीड येथे झालेल्या इशारा मेळाव्यात घेण्यात आला आहे.
यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी या मेळाव्यात सांगितले की, धनगर समाज बांधव मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांना नाही तर पंतप्रधानांना देखील आरक्षणाची घोषणा करावी लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे धनगर आरक्षणाच्या विरोधात आहेत का? काही आदिवासी आमदार हे धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहेत. धनगर आरक्षणासाठी आपल्याला आता निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत आपण सर्वजण एकत्र येऊ या, आपण एकत्र आलो नाही तर आपल्या येणाऱ्या पिढी आपल्याला माफ करणार नाहीत. सत्ताधाऱ्यांकडून वारंवार केवळ आश्वासन दिले जात आहे. मात्र आता आपल्याला आश्वासन नाही, तर आरक्षण हवे. याच आरक्षणासाठी आपण येत्या १७ तारखेला चौंडी येथे अहिल्यादेवींचे दर्शन घेऊन आपल्या शेळ्या मेंढ्यांसह मुंबईकडे कूच करायची आहे. २२ तारखेला आपण मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू करायचे आहे. या उपोषणात आपले बलिदान द्यावे लागले, तरी चालेल पण आता आरक्षण मिळाल्यानंतरच माघारी फिरायचे.