मुंबई – जन्मदात्री आईची निर्घृण हत्या करून तिचे काळीज व अन्य अवयव शिजवून खाण्याचा प्रयत्न करणार्या नराधम मुलाला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे, अशा गुन्ह्यातील आरोपीला माफी नाही. तर या नरभक्षक प्रवृत्तीला ठेचण्याचीच गरज आहे, असे निरिक्षण नोंदवत नराधम आरोपी सुनील कुचकोरवीला कोल्हापूर सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.
या प्रकरणी आरोपी सुनील कुचकोरवी याला कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश महेश कृष्णाजी जाधवयांनी दोषी ठरवून जुलै २०२१ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात आरोपी सुनील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.तर राज्य सरकारने फाशीची शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर दीर्घ सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय आज जाहीर केला. यावेळी आरोपी सुनील कुचकोरवीला विडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खंडपीठासमोर हजर करण्यात आले होते.