- निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचा निष्कर्ष
लंडन – ब्रिटनमध्ये या वर्षी सार्वत्रिक निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी हुजूर पक्षाला फटका बसेल एवढेच नव्हे तर पंतप्रधान ऋषी सुनक यांची न्यू यॉर्कशायरमधील जागाही धोक्यात आहे,असा निष्कर्ष निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.
एका स्वयंसेवी संस्थेने हा दावा केला असून निवडणुकीपूर्वी करण्यात आलेले हे सर्वात मोठे सर्वेक्षण आहे,असे संस्थेचे म्हणणे आहे. या संस्थेने ब्रिटनमधील १५ हजारहून अधिक लोकांची मते जाणून घेतली आहेत. या सर्वेक्षणात ४५ टक्के लोकांनी मजूर पक्षाला पसंती दर्शविली आहे.म्हणजे मजूर पक्षाने हूजूर पक्षावर १९ गुणांनी आघाडी घेतली आहे. याच संस्थे मागील वर्ष अखेरीस घेतलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीच्या तुलनेत मजूर पक्षाने हूजूर पक्षावर घेतलेली ही आघाडी तीन टक्के जास्त आहे.
द संडे टाईम्सने आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. यामध्ये सत्ताधारी टोरी पार्टीला निचांकी मते मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. टोरी पार्टीला शंभरपेक्षा कमी जागा , मजूर पक्षाला ४६८ जागा तर विरोधी पक्ष नेते सर कैर स्टॅमर यांच्या पक्षाला २८६ जागांवर दणदणीत विजय मिळेल, असा अंदाज आहे. पंतप्रधान ऋषि सुनक यांची जागाही धोक्यात आहे,असेही संडे टाईम्सने म्हटले आहे. एकूणच सत्ताधारी हुजूर पक्षासाठी ही निवडणूक अत्यंत निराशादायक ठरेल, असे निष्कर्ष सर्वेक्षणातून निघाला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १५ ,०२९ मतदारांपैकी १५ टक्के लोकांनी आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही,असे मत नोंदविले.