मुंबईतील अमेरिकन दूतावास बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई- मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा ईमेल पाठवला. काल दुपारी हा मेल आला. यामध्ये मुंबईतील अमेरिकन दूतावास बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. वांद्रे-कुर्ला पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला परिसरात अमेरिकन दूतावासाचे कार्यालय आहे. या घटनेनंतर अमेरिकन दूतावासाजवळील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली. हा धमकीचा मेल नेमका कुठून आला याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘काल दुपारी ३ वाजून ५० मिनिटाच्या सुमारास दूतावासाच्या कार्यालयीन मेलवर अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेल पाठवला. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख अमेरिकन नागरिक असल्याचे सांगितले. त्याने मेलमध्ये म्हटले आहे की, मी फरार अमेरिकन नागरिक असून माझ्या विरोधात अमेरिकेत १९ गुन्हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी तात्काळ सार्वजनिकरित्या माफी मागावी, अन्यथा मी अमेरिकेचा प्रत्येक दूतावास उडवून देईन. अमेरिकन नागरिकांची हत्या करण्याचा देखील माझा प्लॅन आहे.’ याप्रकरणी वांद्रे-कुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top