१ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरणार

मुंबई- सध्या राज्यात काही ठिकाणी दिवसा कडाक्याचे ऊन आणि रात्री मुसळधार पाऊस पडत आहे.अशातच आता थंडीची चाहूल लागली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येणार आहे. म्हणजेच दिवाळीपासून राज्यात कडाक्याची थंडी सुरू होणार आहे.

दिवाळीमध्ये सध्या सुरू असलेला पाऊस देखील विश्रांती घेणार आहे. ऑक्टोबर अखेरला पानसाळ्याची सांगता होणार आहे. येत्या आठवडाभरात नाशिक,जालना, संभाजीनगर,जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या भागात थंडीला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी हा अंदाज वर्तवला आहे. गुरुवारपासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते.२६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता आहे.४ दिवसांत दक्षिण नगर ,पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर,सोलापूर, बीड, धाराशिव,लातूर,हिंगोली, नांदेड,परभणी,यवतमाळ, वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया आणि चंद्रपूर या १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे.