- शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले
वॉशिंग्टन – हिंडेनबर्ग अहवालानंतर प्रचंड तोटा सहन करत असलेला अदानी समूह आता आणखी नव्या एका अडचणीत सापडला आहे. काल अमेरिकेत अदानी समूहाचे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले. अदानी समूहाने अमेरिकन गुंतवणूकदारांना दिलेल्या प्रतिनिधित्वाची चौकशी तेथील नियामकांकडून सुरू केली आहे. त्यामुळे ही घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चने शेअर्स किमतीत फेरफार केल्याच्या आरोपानंतर अमेरिकन अधिकारी अदानी समूहाने अमेरिकन गुंतवणूकदारांना दिलेल्या प्रतिनिधित्वाची चौकशी करत आहेत. या चौकशीचा परिणाम अदानी ग्रुप्सच्या शेअर्सवर झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. ज्यामध्ये अदानी पोर्टस्, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मर यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. ब्रुकलिनमधील यूएस अटर्नीचे कार्यालय आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन यांनी अदानी समूहाशी संबंधित संस्थात्मक गुंतवणूकदारांना तपासाशी संबंधीत प्रश्न विचारले आहेत. ज्यामध्ये अदानी समूहाने गुंतवणूकदारांसमोर काय भूमिका मांडली, याची विचारणा करण्यात आली आहे.
अदाणीच्या अमेरिकेतील गुंतवणूकदारांची चौकशी होत असली तरी याबाबतीत कायदेशीर कारवाईचे कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत. परंतु भारतात अदानी समूहाबाबत होत असलेल्या चौकशीनंतर अमेरिकेत होणारी चौकशी महत्त्वाची समजली जात आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि त्यांच्या अकाउंटमध्ये घोटाळा केल्याचे आरोप आहेत.









