अमेरिकेत १७ रुग्णांचा जीव घेणाऱ्या परिचारिकेला ७६० वर्षांचा तुरुंगवास

वॉशिंग्टन

रुग्णांना इन्सुलिनचा जास्त डोस देऊन जीवे मारल्याच्या . प्रकरणी अमेरिकेतील एका परिचारिकेला ७६० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या परिचारिकेने २०२० ते २०२३ या काळात १७ रुग्णांचे प्राण घेतले होते. हेदर प्रेसडी (४१) असे तिचे नाव असून ती पेनसिल्व्हेनियात राहत होती. या परिचारिकेवर खुनाचे आणि खुनाच्या प्रयत्नाचे २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेदर प्रेसडीने एकूण २२ रुग्णांना इन्सुलिनचा जादा डोस दिला होता. यामध्ये काही मधुमेह नसलेले रुग्णदेखील होते. रात्रपाळीत ड्युटीवर असताना ती हे कृत्य करायची. बहुतेक रुग्णांचा डोस दिल्यानंतर काही तासांत मृत्यू झाला होता. तिने ज्या रुग्णांना लक्ष्य केले, ते रुग्ण ४३ ते १०४ वर्ष वयोगटातील होते. न्यायालयात मृत रुग्णांच्या कुटुंबियांनी परिचारिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली. “आमच्या रुग्णाची प्रकृती व्यवस्थित होती, ते आणखी जगले असते, पण या परिचारिकेने त्यांचा जीव घेऊन नियतीच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला,” असे त्यांनी म्हटले. या परिचारिकेच्या सहकाऱ्यांनीही तिच्याविरोधात जबाब दिला. ते म्हणाले, “ती आपल्या रुग्णांचा नेहमी द्वेष करायची. ती रुग्णांबद्दल अपमानास्पद बोलायची.”
दरम्यान,पेनसिल्व्हेनियात मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. पण क्वचितच एखाद्या आरोपीला मृत्यूदंड दिला जातो. प्रेसडीच्या वकिलांनी तिची बाजू मांडताना तिला मृत्यूदंडाची न होण्यासाठी प्रयत्न केले. ३ मे रोजी न्यायालयाने तिला दोषी ठरविले. प्रेसडीला सलग तीन जन्मठेपांची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा ३८०-७६० वर्षांची असू शकते. म्हणजेच तिला मरेपर्यंत तुरुंगातून बाहेर येता येणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top