उपराष्ट्रपतींच्या नकलेवर भाजपा स्वार! आज देशभर आंदोलन! जाटांचाही सहभाग

नवी दिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्यावरील नक्कल प्रकरणावरून गाजला. काल निलंबित खासदारांनी संसदेबाहेर केलेल्या निदर्शनांवेळी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी धनखड यांची नक्कल केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याचा व्हिडिओ बनवला. त्यामुळे धनखड चांगलेच संतापले. माझा वाट्टेल तितका अपमान करा पण उपराष्ट्रपतीपदाचा, माझ्या जातीचा अपमान कसा करता असा सवाल त्यांनी केला. या घटनेवर स्वार होत भाजपाने आज राहुल गांधींच्या विरोधात सूर उंचावला. त्यांनी माफी मागावी यासाठी उद्या देशभरात आंदोलनाची घोषणाही केली.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी संसदेबाहेर सरकारविरोधात निदर्शने करताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नक्कल केली. त्यांच्या या कृत्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. या प्रकारामुळे उपराष्ट्रपती धनखड चिडले. या घटनेचे पडसाद आज दिवसभर उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना दूरध्वनी करून या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. मी स्वत: गेल्या 20 वर्षांपासून अशा प्रकारचा अपमान सहन करत आहे. अजूनही ते थांबलेले नाही. पण हा असा प्रकार थेट देशाच्या उपराष्ट्रपतींच्या बाबतीत आणि तोही संसदेच्या आवारात घडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींकडे या घटनेचा निषेध नोंदवला. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनीही या घटनेचा निषेध केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी धनखड यांची भेट घेऊन या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. धनखड या घटनेबाबत सभागृहात म्हणाले की माझा कितीही अपमान करा. मला त्याची पर्वा नाही. पण उपराष्ट्रपतिपदाचा अनादर मी खपवून घेणार नाही. पदाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी माझी आहे. पण या प्रकारामुळे माझी जात, माझी पार्श्वभूमी आणि या पदाचा अपमान झाला आहे, हे मी सहन करणार नाही.
उपराष्ट्रपतींनी आपल्या जातीचा विषय काढल्यानंतर त्यांचा जाट जातीसमुदाय आक्रमक झाला. जाट समाजाने बैठक घेतली आणि म्हटले की, काँग्रेसने देशाचे उपराष्ट्रपती आणि जाट समाजाचा अभिमान जगदीप धनखड यांची खिल्ली उडवली. याचा हिशेब आगामी लोकसभा निवडणुकीत जाट समाज नक्कीच घेईल. दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर जाट समाजाने निदर्शने केली. खाप प्रधान सुरेंद्र चौधरी यांनी या प्रकरणी तृणमूल काँग्रेस खासदार कल्याण बॅनर्जींनी धनखड यांनी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली. माफी न मागितल्यास त्यांच्या घरांना घेराव घालण्याचा इशारा दिला. राहुल गांधींचाही त्यांनी निषेध केला. भाजपने या घटनेचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की विरोधी खासदारांना निलंबित का करण्यात आले, असा प्रश्न देशाला पडत असेल तर हे कारण आहे.
आज सकाळपासून सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत या मुद्यावरून निषेधाचा सूर आळवला. राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले, ‘उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीचा आम्ही तीव्र निषेध करतो. विरोधक सर्व मर्यादा ओलांडत आहेत. घटनात्मक पदावर असलेल्या लोकांचा ते सातत्याने अपमान करत आहेत. विरोधक गेली 20 वर्षे पंतप्रधानांचा अपमान करत आहेत. कारण ते गरीब पार्श्वभूमीतून आलेले आहेत. राष्ट्रपती दलित महिला असल्याने विरोधकांनी त्यांचा अपमान केला होता. प्रथमच जाट समाजातील कोणीतरी उपराष्ट्रपती झाले आहे. या पदाचाही विरोधकांनी अवमान केला. उपराष्ट्रपती आणि संविधानाचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. हा शेतकरी आणि जाट समाजाचा अपमान आहे. भारत उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही. आम्ही उपराष्ट्रपतींचा तुमचा आदर करतो. आज आम्ही विरोधकांनी केलेल्या कृतीच्या निषेधार्थ उभे राहून संसदेच्या कामकाजात भाग घेऊ.’ यानंतर भाजप आणि एनडीएतील अन्य घटक पक्षांच्या खासदारांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उभे राहून कामकाजाला सुरुवात केली. सुमारे 12 मिनिटे हे खासदार उभेच होते. पण नंतर सभापती धनखड यांनी त्यांच्या या निषेध कृतीचा आदर करत त्यांना बसण्याची विनंती केली. त्यानंतर हे खासदार बसले.
राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकारावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, खासदार संसदेबाहेर निदर्शने करीत बसले होते. मी त्यांचा व्हिडिओ चित्रित केला. तो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये आहे. मी तो प्रसारित केला नाही. कोणीही काहीही बोललेले नाही. 150 खासदारांना निलंबित केले, पण त्यावर माध्यमांमध्ये चर्चा नाही. अदानी, राफेल, बेरोजगारीवर चर्चा नाही. आमचे खासदार निराश होऊन बाहेर बसले आहेत. पण तुम्ही मिमिक्रीवर चर्चा करत आहात. धनखड यांची नक्कल करणारे खासदार बॅनर्जी यांनी या प्रकारावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, उपराष्ट्रपतींबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. नक्कल ही एक कला आहे. पंतप्रधानांनी देखील अनेकवेळी नक्कल केली आहे. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. दुसरीकडे काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत राहुल गांधी यांची नक्कल करीत असतानाचा व्हिडिओ ट्विट करीत, तेव्हा कोण नक्कल करीत होते, आठवते का? असा सवाल केला.
141 खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधकांची निदर्शने सुरूच होती. आधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी गांधी पुतळ्यासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि नंतर संसदेच्या मकर गेटबाहेर निदर्शने केली. जोपर्यंत खासदारांचे निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत विरोधकांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
दरम्यान, संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी आतापर्यंत 141 विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी 107 लोकसभेचे आणि 34 राज्यसभेचे आहेत. या खासदारांना संसदेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा लोकसभा सचिवालयाने एक परिपत्रक जारी करून या खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीत येण्यास बंदी घातली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top