किमान ८ मुले जन्माला घाला! राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा अजब सल्ला

मॉस्को- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या देशातील महिलांना एक विचित्र सल्ला दिला आहे.वर्ल्ड रशियन पीपल्स काउंन्सिलमध्ये बोलताना पुतिन यांनी महिलांना किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आणि मोठ्या कुटुंबांना पुन्हा एकदा आदर्श मानण्याचे आवाहन केले आहे.रशिया-युक्रेन युद्धात रशियाचे ३ लाख सैनिक मारले गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी हा अजब सल्ला दिला आहे.
रशियातील ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पॅट्रिआर्क किरिल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यात रशियातील अनेक पारंपरिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.यावेळी पुतीन म्हणाले की,पुढील अनेक वर्षांसाठी रशियाची लोकसंख्या वाढविणे हे सरकार समोरील महत्वाचे लक्ष्य असणार आहे.जेणेकरून आगामी काळात देशाची लोकसंख्या अपेक्षे प्रमाणे वाढू शकेल.यामुळे रशियाचे भविष्य सुरक्षित होईल.येणारा काळ रशियाचा आहे.तसाच पूर्वीसारखा बलशाली आणि शाश्वत रशिया बनविण्याचा आहे.
रशियातील काही जाती समूहांनी आजही चार,पाच अथवा त्याहून अधिक मुले जन्माला घालण्याची परंपरा जपली आहे.आपल्याला हे लक्षात असायला हवे की, पूर्वी रशियन कुटुंबात आपल्या आजी-पणजीला सात, आठ अथवा त्याहूनही अधिक मुले होत होती. त्यामुळे आता या उत्कृष्ट परंपरांचे जतन आणि पुनरुज्जीवन करू या असे आवाहनही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावेळी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top