कोरोनाची पुन्हा भीती! सिंगापूरमध्ये नवी लाट

सिंगापूर- जगभरातून कोरोना व्हायरस नाहीसा झाला, असे चित्र असले तरी सिंगापूरमध्ये या व्हायरसने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. इथे दररोज कोरोना रुग्णांची संख्या 2,000 ने वाढत आहे. पुढील काही दिवसांत सिंगापूरमध्ये आणखी हजारो लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जगभरात कोरोना पसरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. सिंगापूरमध्ये भारतीयांची संख्या मोठी असल्याने भारताची चिंताही वाढली आहे.
गेल्या तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीत जगभरात लाखो लोकांनी आपला जीव गमावला. त्यानंतर जग पुन्हा पूर्वपदावर येत असताना कोरोनाची नवी लाट सिंगापूरमध्ये आली आहे. सिंगापूरचे आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी सांगितले की, गेल्या तीन आठवड्यांपूर्वी रोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक हजार असायची. मात्र गेल्या दोन आठवड्यात ती 2,000 वर गेली आहे. परंतु मार्च आणि एप्रिल या महिन्यात आलेल्या लाटेप्रमाणे सध्या तरी सामाजिक निर्बंध लादण्यासारखी गंभीर परिस्थिती नाही. गेल्या एप्रिलमध्ये रोजची रुग्णांची संख्या 4 हजारवर गेली होती.
सिंगापूरमध्ये नुकत्याच नोंदवलेल्या कोरोनाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये EG.5 आणि HK.3 या व्हायरसच्या दोन उप-प्रकारांमुळे संसर्ग झाल्याचे आढळले आहे. दोन्ही उपप्रकार XBB Omicron फॉरमॅट गटाशी संबंधित आहेत. 75 टक्के रुग्णांना या दोन उपप्रकारांमुळे संसर्ग होत आहे, अशी माहिती आहे. परंतु करोनाचे हे उपप्रकार यापूर्वीच्या उपप्रकारांपेक्षा धोकादायक नसल्याचे आणि सध्या वापरल्या जाणारी लस त्यावर प्रभावी असल्याचेही सांगितले जात आहेत. मात्र, सिंगापूरमध्ये लोकांना खास करून वयोवृद्धांना योग्य ती खबरदारी आणि लसीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
करोनाची ही नवी लाट सध्या तरी सिंगापूरपुरती असली तरी इथून जगभर होणारी ये-जा लक्षात घेता ती जगभर पसरण्याची शक्यता असल्याने जागतिक आरोग्य संघटनाही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सिंगापूरमध्ये भारतीयांची संख्याही मोठी आहे. हे भारतीय तिथून भारतात पसरल्यास भारतातही करोना पसरू शकतो. विशेष म्हणजे, भारताने अद्यापि करोनासंदर्भात सिंगापूरमधून येणार्या प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केलेली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top