शाहजहांपूर
पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या लष्करी सज्जतेची चाचपणी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून आज उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील गंगा एक्स्प्रेस-वेवर भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने उतरवण्यात आली. यावेळी हवेत विमानांच्या चित्तथरारक कसरतीही झाल्या. युद्धजन्य परिस्थितीत वायुदलाला वेगाने हालचाल करता येण्यासाठी अशी तयारी आवश्यक असते, ती आज भारताने दाखवली
विमाने उतरवण्यासाठी शाहजहांपूर येथे गंगा एक्सप्रेस-वेवर यासाठी साडेतीन किलोमीटर लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली होती. या धावपट्टीवर ही विमाने उतरली व तिथून त्यांनी उड्डाणही केले. या हवाई कसरतीमध्ये राफेल, मिराज – 2000 व जग्वारसारख्या अत्याधुनिक विमानांचा सहभाग होता. या विमानांनी टच एन्ड गो लॅडिंगची प्रात्यक्षिके केली. यामध्ये विमान धावपट्टीच्या अगदी जवळ येऊन पुन्हा आकाशात भरारी घेते. यामुळे गंगा एक्स्प्रेस-वेसारख्या महामार्गांवर विमाने उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा महत्त्वाचा टप्पा आहे. महामार्गांवरील अशा प्रकारचे लँडिंग युद्धजन्य परिस्थितीत वायुदलाच्या हालचाली अधिक वेगाने करण्यासाठी आवश्यक असते. यावेळी वायुदलाच्या अधिकाऱ्यांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व मोठ्या प्रमाणावर नागरिकही उपस्थित होते. हा सारा परिसर वायुदलाच्या विमानांच्या आवाजांनी दुमदुमून गेला होता.
दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख सदानंद दाते आजही काश्मिरात होते. काश्मीरमधील हा त्यांचा दुसरा दिवस होता. त्यांनी तपास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. एनआयएने या हल्ल्याचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. या अहवालात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सुत्राच्या माहितीनुसार या अहवालात पाकिस्तानी गुप्तचर संस्था, इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या संबंधांचे पुरावे देण्यात आले आहेत. आयएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देशानुसार, लष्कर-ए-तोयबाने हा कट आखला होता. तो लष्कर-ए-तोयबाच्या
पाकिस्तानमधील मुख्यालयात रचण्यात आला होता या हल्ल्यात प्रामुख्याने हाश्मी मुसा (उर्फ सुलेमान) आणि अली भाई (उर्फ तल्हा भाई) या दोन दहशतवाद्यांचा हात होता. हे दोघे पाकिस्तानी नागरिक आहेत. मुसा पाकिस्तानी लष्काराचा कमांडो होता. हे दोघे हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानातील हँडलर्सच्या सतत संपर्कात होते. त्यांना हल्ल्याची वेळ, लॉजिस्टिक आणि अंमलबजावणी याच्या सातत्याने सूचना दिल्या जात होत्या. या दहशतवाद्यांनी आपली शस्त्रे बेताब खोऱ्यात लपवली होती. हे ठिकाण हल्ला झालेल्या बैसरन ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.ओव्हर ग्राउंड वर्करयांच्या नेटवर्ककडूनही मदत करण्यात आली. त्यांनी दहशतवाद्यांना राहाण्याची जागा, रस्त्यांबद्दल माहिती आणि हल्ल्याआधी संबंधित ठिकाणांची टेहळणी करण्यासाठी मदत पुरवली.
एनआयएने मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक आणि इलेक्ट्रॉनिक डेटाही गोळा केला आहे. हल्ल्याच्या ठिकाणाहून 40 कार्टेज ताब्यात घेण्यात आली असून ती बॅलेस्टिक आणि रासायनिक विलेषणासाठी पाठवण्यात आली आहेत. याशिवाय खोऱ्यातील जवळपासच्या मोबाईल टॉवरचा डम्प डेटा देखील मिळवण्यात आला आहे. दहशतवादी आधी पहलगाममधील हॉटेलवर हल्ला करणार होते. गुप्तचर यंत्रणांना पहलगाम हल्ल्याची कुणकुण एप्रिल महिन्यांतच लागली होती. मार्च अखेरीस दहशतवादी सोनमर्गला आलो होते. गुप्तचर यंत्रणांना याची माहिती होती, तर त्यांनी काही केले का नाही, याची माहिती घेतली जात आहे.
भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या शक्यतेमुळे पाकिस्तानात मात्र भीतीचे सावट वाढतच आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आली असून या भागातील मदरसे 10 दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत. सगळे धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान चौधरी अनवर उल हक यांनी ही घोषणा केली आहे. यासाठी वाढलेले तापमान असे कारण दिले जात असले तरी मोदींचा भारत या मदरशांना दहशतवादी केंद्रे म्हणून लक्ष्य करू शकतो, अशी भीती पाकिस्तान सरकारला वाटत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 445 अधिकृ मदरसे असून त्यात 26,000 हून अधिक विद्यार्थी आहेत.
हल्ला झाल्यास जेवण, औषधे आणि इतर जीवनाश्यक वस्तूंची कमतरता पडू नये याचीहीतयारी करण्यात आली आहे. युद्ध झाल्यास आर्थिक रसद कमी पडू नये यासाठी एक अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी तयार ठेवण्यात आला आहे. पाकव्याप्त परिसरातील सर्व हॉटेल, गेस्टहाऊस आणि मंगल कार्यालयांचा ताबा पाकिस्तानी लष्कराने घेतला आहे. या इमारती बळजबरीने ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप त्यांच्या मालकांनी केल्या आहेत. आपण या इमारती सैन्यासाठी सोडत असल्याचे त्यांच्याकडून वदवून घेण्यात येत आहे. नीलम खोरे, किशनगंगा नदी परिसर आणि संवेदनशील परिसरात पर्यटनासाठी पूर्णपणे बंदी घातली आहे. अनेक पर्यटकांना मार्बल चेकपोस्टवरूनच परत पाठवण्यात आले आहे. लिपा खोऱ्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ जाण्यास पाकिस्तानी लष्कराने बंदी घातली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून दूर असलेल्या खैबर पख्तुनवा भागातही सायरन लावण्यात आले आहेत.
पाकिस्तानने काल वाघा सीमाही आपल्या बाजूने बंद केली होती. त्यामुळे भारतातून पाकिस्तानात परत जाणारे अनेक जण पाकिस्तानी अडकून पडले होते. आज सकाळी पाकिस्तानने आपल्याकडून ही सीमा पुन्हा उघडल्यानंतर भारतातून रवानगी करण्यात आलेले पाकिस्तानी तिथून आपल्या मायदेशात परतले.
