धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश नको! आदिवासींनी पालघरमध्ये महामार्ग रोखला

पालघर : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नका या प्रमुख मागणी सह इतर अनेक मागण्यांसाठी आज आदिवासी एकता परिषद व भूमिसेनेकडून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर जवळील जव्हार फाटा येथे आदिवासी संघटनांच्या वतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी जवळपास एक तास महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी मोठया प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.पोलिसांकडून यावेळी आंदोलकांना रोखण्यात आले. मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम होते. धनगर समाज आरक्षणासाठी आदिवासी समाजमध्ये घुसखोरी करतोय. आमच्या आदिवासी समाजाचा याला विरोध आहे. आता शिक्षक भारती आहे. तलाठी भरती आहे. मात्र या आरक्षणाच्या मुद्यांमुळे त्यालाही स्थगिती देण्यात आली आहे. सर्व बाजूनी आम्हाला दाबण्याचा परिणाम होत आहे. पालघर जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो. आम्हाला इथे कोणत्याही सुविधा नाहीत. ज्या आहेत त्यातही जर दुसऱ्यांची घुसकोरी होत असेल तर आम्ही काय करायचे असे प्रश्न यावेळीआंदोलकांकडून उपस्थित करण्यात आले.या वेळी आदिवासी एकता परिषद व भूमिसेनेकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देऊ नये, राज्य सरकारने कंत्राटी भारतीय संदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा, सरकारी शाळांचे खाजगीकरण बंद करावे, मनोर येथील ट्रॉमा केअर रुग्णालयाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे,वाढवण बंदर कायमचे रद्द करा, मनोर- जव्हार फाटा येथील उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करावे, पेसा भरतीची संपूर्ण अंमलबजावणी करावी अशा मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात आदिवासी एकता परिषद व भूमिसेना या आदिवासी संघटनांचे जवळपास एक हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा यावेळी भूमिसेनेचे संस्थापक अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी दिला.याआंदोलनाला महविकास आघाडी मधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करू नका, असा केंद्राला इशारा दिला आहे. या आंदोलनात खासदार राजेंद्र गावित सहभागी होऊन त्यांनी बंदर विरोधी भूमिकेला पाठिंबा दर्शवला. लोकप्रतिनिधींना निवेदन देणार असल्याचे सांगितल्याने मोर्चेकरांची भेट घेण्यासाठी व त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी आपण गेल्याचा खुलासा खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top