पहिल्याच पावसात मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो पाण्यात!

मुंबई- मुंबईत दाखल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो-3 मार्गिका पाण्यात गेली. या ठिकाणी पाणी शिरणार नसल्याचा सरकारचा दावा पहिल्याच पावसात सपशेल फोल ठरला.
आरे जेव्हीएलआर ते वरळी ही मेट्रो-3 ॲक्वा लाईन भूमीगत मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाली होती. 9 मे रोजी वरळी ते मरोळ या मेट्रो ॲक्वा मार्गिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले होते. परंतु मुंबईच्या पहिल्याच पावसात ही भुयारी मेट्रो अक्षरशः पाण्यात गेली. या मेट्रोच्या वरळी आचार्य अत्रे स्थानकाच्या छतातून आज धोधो पाणी बरसले आणि संपूर्ण स्थानक जलमय झाले होते. मेट्रोच्या पायऱ्यांवर पाणी वाहू लागले. मेट्रो ट्रेनमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना या पाण्यातून मार्ग काढत कसरत करावी लागली. पाणी शिरल्याने स्थानकातील सुरक्षा उपकरणे, चेकिंग पॉईंट, सरकते जिने आणि लाखोंच्या उपकरणांचे नुकसान झाले. सर्वत्र चिखल झाला. मेट्रो प्रशासनाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी वृत्तांकन करण्यास बंदी केली. पत्रकारांना वरळी आचार्य अत्रे स्थानकातून हाकलून देण्याचा प्रकार झाला. उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनाही स्थानकात प्रवेश नाकारला. मेट्रोची वाहतूक बंद करण्यात आली. प्रवासी व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.
मेट्रो-3 च्या परिसरात असलेल्या वसाहतीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. नागरिकांनी सांगितले की, मेट्रो तयार करताना ड्रेनेजचा विचार केला नाही. अत्यंत घाईत हे काम पूर्ण केले. काम सुरू झाल्यापासून गेली चार वर्षे आम्हाला हा त्रास सुरू आहे. अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले. या ठिकाणी सर्व पालिका कर्मचारी राहतात. आम्ही जनतेच्या सेवेसाठी, शहराच्या साफसफाईसाठी कामे करतो. आज आमच्या घरात सांडपाणी शिरले आहे. ते कोण साफ करणार?
या सगळ्या प्रकारानंतर मेट्रो प्रशासनाने स्पष्टीकरण दिले की, मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकाजवळ एक संरक्षक भिंत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरले. या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग जाण्यायेण्यासाठी वापरात नव्हता. पुढील 3 महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्पुरते संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू होते. हे पूर्ण काम 10 जूनपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज होता. मात्र पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसामुळे भिंत पडली. खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती बंद आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळीपर्यंतची भुयारी मेट्रो वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. मेट्रो-3 चे अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे मेट्रो स्थानकाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. परंतु माध्यमांप्रमाणेच त्यांचीही अडवणूक केली. यावेळी त्यांनी भाजपा, शिंदे गट व राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, मुंबईत हा पहिला पाऊस नाही, मे च्या पहिल्या आठवड्यात सुद्धा अंधेरी, साकीनाका येथे वाईट अवस्था झाली होती, शहरात नालेसफाई झालेली नाही. स्वतःला, इन्फ्रा व्हिजनरी म्हणून घेणारे कुठे आहेत? त्यांनी ग्रीन कार्पेट घालून नालेसफाईची पाहणी केली होती. त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे. भाजपा केंद्रात आणि राज्यात 10 वर्षे आहे. ते किती भ्रष्ट आणि निकामी आहेत हे आपल्याला दिसते आहे. मुंबईकर भाजपावर विश्वास ठेऊ शकत नाही. भाजपाला मुंबईचा द्वेष का आहे? एकनाथ शिंदे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आले आहे. मुंबईत दोन वर्षांत रस्ते खड्डेमुक्त करू असे त्यांनी सांगितले होते. त्यांनी त्यांच्या खिशातील खड्डे भरले. परंतु मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त झाले नाही. कधीही झाली नव्हती अशी परिस्थिती आज उद्भवली आहे. संपूर्ण पालिका मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्र्यांच्या खिशात आहे.