मतदान करून सुप्रिया सुळे थेट पोहोचल्या अजित पवारांच्या घरी! राजकारणात खळबळ

बारामती- आज बारामती लोकसभा मतदारसंघाचा अत्यंत महत्त्वाचा मतदानाचा दिवस होता. याच दिवशी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मतदान केल्यानंतर थेट अजित पवारांचे घर गाठले. यामुळे खळबळ माजली.
अजित पवारांच्या घरातून बाहेर पडल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी फक्त माझी काकी आशा पवार (अजित पवारांच्या मातोश्री) यांना भेटले. मी इतर कुणालाही भेटले नाही. माझी काकी बऱ्याच दिवसांनी आल्याने मी त्यांना भेटायला गेले, माझे बालपण या घरी गेले आहे. हे आशा काकीचे घर आहे. शाळेला सुट्टी लागली की, मी दोन दोन महिने इथे राहायची, माझी आशा काकी जगातील सर्वात चविष्ट पोळीच्या चुरम्याचे लाडू बनवते. ती इथे आली आहे म्हटल्यावर मी तिला भेटायला आले आणि तिचे आशीर्वाद घेतले. मोठ्यांचे आशीर्वाद घेणे ही आमच्या कुटुंबाची संस्कृती आहे. प्रताप काका, सुमती काकी सर्वांनाच मी भेटले.
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर या भेटीमुळे निर्माण झालेले वादळ शमले होते. मात्र त्यानंतर या भेटीवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी अजित पवारांना अहंकारी म्हटले आणि वाद सुरू झाला. रोहित पवारांना उत्तर देताना अजित पवार गटाचे प्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांना ‘बेअक्कल’ म्हटले.
सुप्रिया सुळेेंच्या भेटीबद्दल प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, सुप्रिया ताईंनी घरातील वयस्कर व्यक्तींचा आदर ठेवला. माझ्या पिढीसाठी हा आदर्श आहे. अजित पवारांमध्ये जो अहंकार आहे तो सुप्रिया ताईंमध्ये नाही. रोहित पवारांच्या प्रतिक्रियेमुळे अमोल मिटकरी संतापले आणि म्हणाले की, बेअक्कल लोकांबद्दल मी बोलत नाही. सुप्रिया सुळे भेटायला गेल्या हे त्यांचे संस्कार आहे. रोहित पवारांनी त्यांच्याकडून थोडी अक्कल घ्यावी. अजित पवार त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. पवार कुटुंब संस्कार जपणारे आहे. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाने कधी कुणाचा अपमान केला नाही. हे संस्कार त्याने शिकावे. शेवटी सुप्रिया सुळेंना कालही जाऊन भेटता आले असते. आशा पवार कालच आल्या आहेत, पण आज मतदानाच्या दिवशी जाऊन भेटायचे, पत्रकारांना सोबत न्यायचे हे कशासाठी आहे.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस या भेटीबाबत म्हणाले की, ही भावनिक खेळी आहे. पण यावर मी जास्त बोलू इच्छित नाही. कारण शेवटी ते भाऊ-बहीण आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top