मशिनला जमले नाही! ‘उंदीर’ कामगारांनी केले! 17 दिवसांनंतर अखेर बोगद्यातील मजुरांची सुटका

डेहराडून- उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात गेले 17 दिवस अडकलेल्या 41 मजुरांची सुटका होण्याचा दिवस अखेर उजाडला. अमेरिकेच्या ऑगर मशिनला जे जमले नाही ते भारतातील ‘उंदीर’ कामगारांना जमले आणि अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यात पावणेआठ वाजताच्या सुमारास सुरुवात झाली. अवघ्या पाऊण तासात सर्व 41 मजुरांना बाहेर काढण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपल्या प्रियजणांना पाहण्यासाठी बोगद्यामध्ये जमलेले त्यांचे कुटुंबिय भावविवश झाले होते. उत्तराखंड सरकारने या मजुरांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेहून बोगदा खणण्यासाठी आणलेले ऑगर मशीन वारंवार तुटले. यामुळे प्रत्येक दिवस निराशेत जात होता. अखेर मेघालयात अधिक प्रमाणात कार्यरत असलेल्या ‘रॅट होल’ खाण कामगारांना पाचारण करण्यात आले. या खाण कामगारांच्या कार्यपद्धतीवर 2014 साली बंदी घालण्यात आली होती. त्यांची काम करण्याची ही पद्धत असुरक्षित आणि विज्ञानाच्या विरुद्ध असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र आज त्यांच्यामुळे सुटकेचा दिवस उजाडला. हे ‘उंदीर’ कामगार कोळसा बाहेर काढण्यासाठी जेमतेम 4 फूट लांबीचे खड्डे खणतात. या खड्ड्यात बोगदा केला जातो. त्या बोगद्यात शिरून आतील कोळसा बाहेर काढला जातो. हा बोगदा अतिशय अरुंद असल्याने अधिक करून बारीक चणीच्या लहान मुलांचा वापर यासाठी केला जातो. एक जण कुऱ्हाडीने आणि इतर अवजाराने खड्डा खणतात. दुसरा मलबा बाहेर काढतो. तिसरा बोगद्यात शिरून कोळसा बाहेर काढतो. मात्र अशा प्रकारे कोळसा बाहेर काढताना अनेकदा अपघात झाल्याने यावर बंदी आणण्यात आली होती. आता मात्र याच कामगारांची कसब पणाला लागली आणि त्यांनी बोगद्याची भिंत खणून आतमध्ये पाईप टाकण्यात यश मिळविले.
आज बोगद्यात 800 मि.मी व्यासाचा पाईप टाकण्यात यश आल्यानंतर दुपारी बचाव टीम मजुरांपर्यंत पाईप पोहोचविण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर या पाईपमधून मजुरांना एकेक करून बाहेर काढण्याची तयारी पूर्ण झाली.
संध्याकाळी 7.05 वाजता पाईप बोगद्यातील मातीच्या ढिगाऱ्यामधून आरपार पोहोचवण्यात आला. त्यानंतर पावणेआठ वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजुराला बाहेर काढण्यात आले. पाईपमध्ये स्ट्रेचर टाकून दोरखंडाने खेचून त्याला बाहेर काढण्यात आले. तो तंदुरुस्त होता. त्यानंतर एकेक मजुरांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. एका मजुराला बाहेर काढण्यासाठी केवळ 3-4 मिनिटांचा वेळ लागत होता. पाऊण तासांत सर्व 41 मजुरांना बाहेर काढण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी त्याची विचारपूसही केली. त्यांच्या गळ्यात हार घालून, शाल देऊन त्यांचे स्वागत केले. हे सर्व मजूर तंदुरुस्त होते. या मजुरांना लगेच रुग्णवाहिकेत बसविले जात होते. त्यांना चिन्यालीसॉर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यासाठी हायवे मोकळा करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. या मजुरांना बाहेर काढले जात होते तसे बाहेर जमलेल्या लोकांकडून जयघोष सुरू होता. ‘नागनाथ बाबा की जय’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. सगळ्यांचेच चेहरे आनंदाने फुलून गेले होते. मजुरांचे नातेवाईकही भावुक झाले होते. ते म्हणाले की, आम्ही 17 दिवस येथे आहोत. आज खूप आनंद होत आहे. आज दिवाळी साजरी होत आहे.
बोगद्यात अडकलेल्या गब्बर या मजुराचा भाऊ जैवाल सिंग याने सांगितले की, 17 दिवस बोगद्यात अडकूनही गब्बरचे मनोधैर्य खचले नाही. त्याच्या मनोधैर्याला सलाम.
बोगद्यात अडकलेल्या एका मजुराच्या मिर्झापूर गावात सुटकेची बातमी ऐकून शंखनाद करण्यात आला. घराबाहेर पणत्या लावण्यात आल्या आणि मिठाई वाटण्यात आली. लखमपूर शेरी येथील मनजितच्या वडिलांना तर अश्रू आवरले नाहीत. मनजितच्या बहिणीने यंदा भाऊबीजही साजरी केली नाही. मनजितची आई म्हणाली की, आम्ही दिवाळीला मनजितची खूप वाट पाहिली. त्याचे वडिल 10-12 दिवस बोगद्याच्या ठिकाणी होते. त्यांचे पैसेही संपले. आता दोघे घरी येतील. बाहेर आल्यानंतर मनजितने मला फोन केला होता. सर्व ठिक आहे, असे तो म्हणाला.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी मजुरांच्या सुटकेच्यावेळी बोगद्यात हजर होते. ते म्हणाले की, हे खूप आव्हानात्मक काम होते. अनेक त्यात अनेक एजन्सी सहभागी होत्या. या मजुरांच्या सुटकेसाठी लोकांनी देवाकडे धावा केला होता. आज तो देवाने ऐकला. आता हे मजूर बाहेर आले आहेत. आधी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी पाठवायचे का? याचा निर्णय घेतला जाईल.
मजुरांच्या सुटकेसाठी गेले काही दिवस देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या होत्या. त्यामध्ये नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस यासह विविध एजन्सी बचावकार्यात सहभागी होत्या. अखेरीस लष्करालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करूनही गेल्या 17 दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात अपयश येत होते.
सुरुवातीला बोगद्यात खोदकाम करताना ऑगर मशीनला बोगद्यातील दगडांचा अडथळा आला. त्यानंतर या मशीनचा प्लॅटफॉर्म तुटला. सरतेशेवटी मशीन बोगद्यातील लोखंडी सळ्यांना अडकल्याने मशीनचे पाते तुटले. तेव्हापासून मशीनचे काम ठप्प पडले. त्यानंतर मानवी खोदकाम सुरू करण्यात आले. बोगद्यात अडकलेल्या मजुरांची सुटका होईल, असे अनेकदा सांगितले गेले. परंतु दरवेळी काही ना काही विघ्ने येऊन मजुरांची सुटका लांबणीवर पडत होती. त्यामुळे या मजुरांच्या नातेवाईकांसह सगळ्या देशवासीयांचा धीर खचत चालला होता. मजुरांचे नातेवाईक संतप्तही होत होते. परंतु बोगद्यातील मजुरांनी आपले मनोधैर्य कायम ठेवले होते.
या मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात हवामानाचा अडथळा होता. कारण या भागात गेले काही दिवस खूप थंडी पडली आहे. रात्रीचे तापमान 5 डिग्री सेल्सियसवर, तर दिवसाचे तापमान 12 ते 14 इतके होते. या बिकट परिस्थितीत बचावकर्त्यांचे काम चालू होते. ऑस्ट्रेलियन अरनॉल्ड श्मिड यांनी या बचावकार्याचे नेतृत्व केले होते.
मजुरांच्या सुटकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, उत्तरकाशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावूक करणारे आहे. बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की, तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आणि चांगले आरोग्य इच्छितो.प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजनांना भेटणार आहेत ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top