राणा दाम्पत्य पुन्हा गैरहजर सत्र न्यायालयाने खडसावले

  • १९ जानेवारीला हजर
    राहण्याचे सक्त आदेश

मुंबई-दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट धरणारे राणा दाम्पत्य पुन्हा एकदा न्यायालयात गैरहजर राहिले. त्यामुळे विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा यांच्या वकिलांची चांगलीच कानउघाडणी केली. न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत पुढील सुनावणीला गैरहजर राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाईल असा स्पष्ट इशारा देत ही सुनावणी १९ जानेवारी रोजी होईल असे जाहीर केले.

खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी याआधी दोघांना पोलिसांनी अटकही केली होती.त्यानंतर आता राणा दाम्पत्याने त्यांना दोषमुक्त करावे असा अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर राणा दांपत्याचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळत आरोप निश्चितीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार काल याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी राणा दाम्पत्य गैरहजर राहिले. याआधीही राणा दाम्पत्याने अनेकदा न्यायालयात गैरहजर राहिले आहे. मात्र काल न्यायालयाने याप्रकरणी आपला संताप व्यक्त केला. गैरहजर राहण्यासाठी पळवाटा काढता, हे खपवून घेणार नाही, पुढच्या सुनावणीला गैरहजर राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट काढून असा न्यायालयाने दमच भरला. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top