राहुल गांधींनी कुत्रीला नूरी नाव दिले! एमआयएमच्या नेत्याची न्यायलयात धाव

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील एमआयएमचे नेते मोहम्मद फरहान यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. गांधींच्या नूरी कुत्र्यामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याचा दावा करत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.
४ ऑक्टोबरला जागतिक वन्यजीव दिवसाच्या निमित्ताने राहुल गांधींनी त्यांच्या आई काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गोव्यावरून आणलेले नूरी नावाचे एक कुत्र्याचे पिल्लू भेट म्हणून दिले. याबाबत राहुल गांधींनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ प्रसिध्द करत “नूरी…कुटुंबातील सर्वात नवीन सदस्य” असे लिहीले आहे. फरहान यांनी राहुल गांधींना कुत्रीचे नाव बदलून जाहीर माफी मागण्याचाही सल्ला दिला होता, मात्र राहुल गांधींनी त्यावर कोणतीही कृती केली नसल्यामुळे त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. येत्या ८ नेव्हेंबर रोजी मोहम्मद फरहान यांना जबाब नोंदवण्यासाठी पाचारण करण्यात आले असून त्यानंतर न्यायालयाकडून राहुल गांधींनाही समन्स बजावण्यात येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
न्यायालयात राहुल गांधींविरोधात याचिका दाखल करताना मोहम्मद फरहान यांनी या नावाचा पवित्र कुराणमध्येही समावेश असल्याचा उल्लेख केला आहे. नूरी हे नाव मुस्लीम धर्माशी संबंधित असून त्याचा उल्लेख कुराणमध्येही आहे. आम्ही राहुल गांधींविरोधात या कृत्यासाठी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.
‘राहुल गांधींचे हे कृत्य निषेधार्ह व लाजिरवाणे आहे. कुत्रीला नूरी नाव देऊन गांधी परिवाराने मुस्लीम समाजातील मुलींचा अवमान केला. यावरून मुस्लीम मुली व मुस्लीम समाजाबाबत गांधी परिवाराचा नकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो’, अशी टीका मोहम्मद फरहान यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top