मुंबई – शिवसेनेत प्रथम बंडखोरी केलेल्या 16 आमदारांच्या पात्रतेचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी चालना दिली. यामुळे 4 ऑगस्टला अधिवेशन संपताच निर्णय होईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी चर्चा सुरू झाली.
आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आमदारांच्या पात्र-अपात्रेबाबत विधिमंडळात सचिवांची बैठक घेतली. यावेळी शिंदे गटाच्या ज्या आमदारांनी नोटिसला उत्तर दिले त्या उत्तरांबाबत चर्चा झाली. काही आमदारांनी उत्तर देण्यास मुदतवाढ मागितली आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा यावरही चर्चा झाली.
ठाकरे गटाने उत्तर देण्यास नकार दिला आहे. आम्ही तक्रारदार असल्याने आम्ही उत्तर देण्यास बांधिल नाही असे त्यांचे म्हणणे आहे. या बैठकीत काय चर्चा झाली ते सांगण्यात आले नाही. अधिवेशन सुरू असल्याने राहुल नार्वेकर यांनीही बैठकीबाबत मौन पाळले.
न्यायालयाच्या आदेशानंतर आमदार पात्र- अपात्रतेच्या बाबतीत राहुल नार्वेकर यांना वाजवी वेळेत निर्णय घ्यायचा आहे. साधारपणे 10 ऑगस्टपर्यंत निर्णय जाहीर होणे अपेक्षित आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालथ होईल. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद गेले तर अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन घेऊनच राष्ट्रवादीत फूट पाडली असे म्हणतात. त्यामुळे राहुल नार्वेकर ऑगस्ट महिन्यात काय निकाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अपात्र आमदारांचा निर्णय प्रक्रियेला वेग! ऑगस्टमध्ये निकाल?
