अवकाळीचा तडाखा! अतोनात नुकसान

मुंबई- अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. गेले दोन दिवस राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात अवकाळीने मोठे नुकसान केले आहे. त्यातच पुण्यातल्या आंबेगावाला गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. कांदा आणि बटाटा पिकांची नासाडी झाली, तर निफाडलाही गारपिटीने झोडपले असून, याचा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या भागात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे, प्राथमिक अहवाल द्यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यांत काल रात्री कोसळलेल्या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजला आहे. सुरुवातीपासूनच पाऊस कमी असतानाही शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जोपासले होते. परंतु कालच्या पावसाने शेतकऱ्याच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. पुण्यातील उत्तर भागाला काल अवकाळीने चांगलेच झोडपले असून, लोणी, धामणी, खडकवाडी गावातील शेतकऱ्यांच्या कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. या अवकाळीमुळे जळगावात ऊस आडवा झाला आहे. याशिवाय अमरावतीमध्येही कापूस, हरभरा पिके कोलमडून पडली.
वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसाचा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. पारनेर तालुक्यात कांदा, टोमॅटो, मका, ज्वारी तसेच फळबागांचेही नुकसान झाले आहे. पारनेरच्या पानोली, जवळा, निघोज या गावांमध्ये गारांमुळे झालेल्या नुकसानीची पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी सकाळी पाहणी केली. शासनाने तातडीने या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी केली. दरम्यान, गारपिटीमुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होऊन भविष्यात पुन्हा ‘कांदा’टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. परभणीत 90 मिलिमीटर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले, कृषी मंत्री दादा भुसे यांनी निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली.
पावसाचा सर्वाधिक फटका नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली जवळपास 20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजल्याने खराब होण्याची शक्यता आहे. पावसात भिजल्याने 30 टक्के मिरची खराब होण्याची शक्यता आहे. दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सुक्या मासळीचे नुकसान
दिवाळीनंतर मच्छीमारांनी समुद्रातील मासेमारीला सुरुवात केली होती. नोव्हेंबरमध्ये मच्छीमार बांधव मासळी सुकवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. परंतु अचानक सुरू झालेल्या पावसाने सुकवण्यासाठी ठेवलेली मच्छी खराब झालीच. शिवाय पुढील काही दिवसात मासे सुकवणे अडचणीचे झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top