इस्रायल, हमास युद्धात कतार, इजिप्तची मध्यस्थी

*महिला आणि मुलांच्या
सुटकेसाठी करणार प्रयत्न
दोहा : हमास आणि इस्रायल या दोघांच्या युद्धात आता कतार आणि इजिप्त या देशांनीही मध्यस्थी करत संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध गाझा पट्टीव्यतिरिक्त इतर भागात पसरण्याचा धोका वाढला आहे. लेबनॉनमधून इस्रायलच्या भागात घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता कतारकडून दोन्ही बाजूंनी मध्यस्थी केली जात आहे. कतारकडून हमासशी संबंधित लोकांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हमासकडून ओलीस ठेवण्यात आलेल्या महिला आणि मुलांच्या सुटकेसाठी कतारने हमासच्या अधिकाऱ्यांशी मध्यस्थी करण्याबाबत चर्चा देखील सुरु केली आहे. इजिप्त देखील हमास आणि इस्रायलच्या संपर्कात आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज चौथा दिवस. दोन्ही बाजूंनी सुरू असलेला तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. इस्रायलही हमासने डागलेल्या रॉकेटला चोख प्रत्युत्तर देत आहे. हमासच्या सैनिकांनी इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. कतारकडून ओलिसांच्या देवाणघेवाणीसाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. कतारी मध्यस्थांनी हमासच्या अधिकाऱ्यांना इस्रायली तुरुंगात असलेल्या ३६ पॅलेस्टिनी महिला आणि मुलांच्या बदल्यात गाझामध्ये पकडलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करण्याची ऑफर दिली आहे. या प्रकरणी इस्रायलशी चर्चा सुरू आहे. शनिवारी रात्रीपासून कतार अमेरिकेशी समन्वयाने चर्चा करत आहे, या चर्चेत सकारात्मकता असली तरी अद्याप या प्रकरणात यश येण्याची चिन्हे नाहीत. दोन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. कतार दोहा आणि गाझा येथील हमासच्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कात आहे. तर दुसरीकडे इजिप्त देखील हमास आणि इस्रायलच्या संपर्कात आहे. दोघांमधील भांडण आणखी वाढू नये यासोबतच इस्रायली ओलीसांच्या सुरक्षेसाठी चर्चा सुरू आहे. इजिप्तने इस्रायलला संयम पाळण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून लवकरच तणाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यांमुळे हे प्रयत्न यशस्वी होणे आणखी कठीण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top