उत्तराखंड बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा कुटुंबीयांशी संवाद

डेहराडून

उत्तराखंडच्या उत्तरकाशीच्या सिल्कियारामध्ये बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांनी आज पहिल्यांदा कुटुंबीयांशी संवाद साधला. याचा पहिला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. गेल्या १० दिवसांपासून हे कामगार बोगद्यामध्ये अडकले असून आज पुन्हा खोदकामासाठी लावलेले जुने ऑगर मशीन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यातून आता पाचवा पाईप पुढे सरकवण्यात आला. मशीन चालवताना आतून कंपने जाणवत असल्याने येथे फक्त आवश्यक ऑपरेटर आणि तज्ज्ञच आहेत.

बोगद्यात आतापर्यंत सुमारे ३४ मीटर खोदकाम करण्यात आले आहे. यापूर्वी २२ मीटरपर्यंत ९०० मिमी व्यासाचे पाइप टाकण्यात आले होते. त्यांच्या आत ८२० मिमी व्यासाचे १२ मीटर पाईप टाकण्यात आले आहेत. बचाव मोहिमेचे प्रभारी कर्नल दीपक पाटील यांनी सांगितले की, या पर्यायी लाईफलाइनद्वारे बोगद्यात अन्न, मोबाइल आणि चार्जर पाठवता येतील.कामगारांची स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांच्या मदतीने त्यांच्यासाठी कुठले खाद्य पाठवायचे याचा एक तक्ता तयार केला आहे. त्यानुसार आम्ही केळी, सफरचंद, खिचडी आणि लापशी रुंद तोंडाच्या प्लास्टिकच्या दंडगोलाकार बाटल्यांमध्ये पाठवत आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top