उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खात्यातून 50 कोटी काढले शिंदे गटाची गंभीर तक्रार! पोलीस तपास सुरू

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचीच असा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने एका दिवसात शिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये काढून घेतले, असा आरोप शिंदे गटाने केला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. शिवसेना पक्षाचा 2020-2021 साली 1 अब्ज 86 कोटी 84 लाख 49 हजार 348 रुपये इतका निधी होता.
निवडणूक आयोगाने खरी शिवसेना शिंदे गटाचीच असा निकाल दिल्यानंतर झालेल्या पहिल्याच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आपण शिवसेनेचा पक्ष निधी, शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा अशा कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही. सेनाभवन हे आमच्यासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेले मंदिर आहे. त्यावर आम्ही कधीही दावा सांगणार नाही. आमच्यासाठी बाळासाहेब यांचे विचार हेच सर्वस्व आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली होती. परंतु आता त्यांच्या भूमिकेत बदल झाला असून पक्ष निधीबाबत शिंदे गटाने पोलिसांत तक्रार
दिली आहे.
त्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी ठाकरे गटाकडे आर्थिक व्यवहारांचा तपशील मागितला आहे. आयकर विभागाला पत्र लिहून ठाकरे गटाच्या वतीने कराचा भरणा कोण करतो, कोणत्या बँक खात्यातून भरला जातो याची माहिती मागविली आहे. शिवसेनेची खाती असलेल्या बँकांच्या अधिकार्‍यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.

दोन अब्जांचा निधी
दरम्यान, शिवसेनेने सन 2020-21 या आर्थिक वर्षातील अहवालात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यानुसार शिवसेनेकडे निधी 1 अब्ज 86 कोटी 84 लाख 49 हजार 348 रुपये एवढा दाखविला होता. विशिष्ट कामांसाठी राखून ठेवलेला निधी 4 कोटी 97 लाख 3 हजार 685 रुपये तर त्यावर्षातील पक्षाची मिळकत 13 कोटी 84 लाख 11 हजार 229 रुपये एवढी दाखविली होती.
मागील वर्षीच्या अहवालानुसार पक्षाने एकूण 7 कोटी 91 लाख 50 हजार 973 रुपये विविध कामांवर खर्च केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. निवडणुकीवर 32 लाख 40 हजार 39 रुपये, कर्मचारी खर्च 52 लाख 23 हजार 453 रुपये, प्रशासकीय व इतर खर्च 2 कोटी 2 लाख 78 हजार 300, वित्तीय व्यवस्थापन खर्च 26 हजार 27 रुपये आणि इतर खर्च 5 कोटी 3 लाख 78 हजार 300 अशाप्रकारे निधी खर्च करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top