कार्तिकी यात्रेतील गुरे बाजारात यंदा कोट्यवधींची उलाढाल

पंढरपूर- कार्तिकी एकादशीला भरलेल्या जनावरांच्या बाजारात यंदा तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. यंदा कार्तिकीचा गुरांचा बाजार भरणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने घेत येणाऱ्या सर्व जनावरांची तपासणी करून बाजार भरवण्यात आला. यामुळे अनेक चांगल्या दर्जाची खोडे, देशी गाई, बैल, पंढरपुरी म्हशी बाजारात आल्या होत्या.

कार्तिकी यात्रेनिमित्त तीन वर्षानंतर वाखरी येथील पालखी तळावर तीन ते चार दिवस जनावरांचा बाजार भरला होता. तीन वर्षानंतर बाजार भरला असल्याने जनावरांची आवक मोठ्या संख्येने झाल्याने पालखी तळाची जागा अपुरी पडली.त्यामुळे आसपासच्या खासगी जागेत जनावरे बांधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. चार दिवसांत बाजार समितीकडे ३ हजार ३४५ जनावरांची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक बैल, खिलार गाय, म्हैस आणि रेडा, संकरीत गाई, अशी जनावरे विक्रीसाठी आली होती. त्यामध्ये दोन हजारांहून अधिक जनावरांची विक्री झाली असून २ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. या बाजारात पंढरपूरचे कुस्तीपटू नितीन घंटे यांच्या कपिला गाईसाठी तब्बल ५ लाखांची सर्वाधिक बोली लावण्यात आली. बाजार समितीकडे नोंदणी न करताच हजारो जनावरांची खरेदीविक्रीही झाली. यामुळे बाजार सिमतीला काही प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार असून चुकीच्या पद्धतीने झालेल्या खरेदीचा फटका पशुपालकांनाही बसला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top