जालन्यातील दंगलीमागे ठाकरे-शरद पवार गट! शिरसाटांचा आरोप! अधिवेशनात पुरावे देणार

छत्रपती संभाजीनगर- मनोज-जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी अंतरवाली सराटी येथे झालेल्या दंगलीतील आरोपींचे सगळे व्हिडिओ आणि फोटो आमच्याकडे आहेत. या दंगलीच्या मागे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा हात होता. या दंगलीसंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार आणि सगळे पुरावे मांडणार आहे, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज केला. छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, ‘अंतरवाली येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. मुळात जालन्यात दंगल कशी घडेल, यासाठी काही बडे नेते प्लॅन करत होते. हा बनलेला प्लॅन अंमलात कसा आला, हे दंगलीचा घटनाक्रम पाहिला तर लक्षात येईल. कुणाच्या मृत्यूनंतरही हे बडे नेते कोठे जात नाहीत. पण मग दंगलीनंतर हे तातडीने अंतरवालीमध्ये का गेले होते? दंगल घडवणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार. राज्यात दंगली घडवून सरकार कसे बदनाम होईल, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला होता. याचा 7-8 मिनिटांचा व्हिडिओ आहे. त्यात सगळे चित्र स्पष्ट आले आहे. शांततेत चालणाऱ्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा जे प्रयत्न करत होते, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे. एकीकडे राज्यात शांतता नांदू द्या म्हणायचे तर दुसरीकडे जातीजातीत दंगली भडकवण्याचे काम जाणुनबुजून करायचे हे त्यांनी केले. सरकारला विनंती आहे की, या दंगलीच्या मागचे मुख्य सूत्रधार शोधले पाहिजेत. पोलिसांनी पकडलेला खरच आरोपी आहे की, हा फक्त एक मोहरा आहे याचा शोध घ्यायला पाहिजे. ज्याला अटक केली त्याला सुपारी देण्यात आली होती का? मराठा आमदार सोळंके हे मराठा असूनही त्यांचे घर कुणी जाळले? सोळंकेंनी तर मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. तरी त्यांचे घर
जाळण्यात आले.’
या दंगलीसंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार आणि सगळे पुरावे देणार आहे. दंगलीच्या आरोपींचे सगळे व्हिडिओ आणि फोटो आमच्याकडे आले आहेत. रोहित पवार म्हणतात की, या दंगलीसंदर्भात चौकशी सुरू आहे. जे कोणी आरोपी आहेत ते या चौकशीदरम्यान समोर येतील. पण ही दंगल झाली तेव्हा त्या भागात कोण बैठक घेत होते, हे लवकरच समोर येईल. स्वतः सगळे करायचे आणि नामानिराळे व्हायचे, ही तर या नेत्यांची सवय आहे. आम्ही आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करू. ही दंगल घडवणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या दंगलीमुळे महाराष्ट्रात तेढ निर्माण झाली. त्याचे फोटो कुणासोबतही असले तरी दंगल करायला लावणारे हे लोक आहेत. स्वत:च्या न्याय हक्कासाठी मागणी करताना इतरांनी दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करतो आहे. अशावेळी अनेक वर्षे ज्यांनी राजकारण केले, त्यांनीच जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम केले. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,’ असेही शिरसाट म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top