दिवसा रेकी करून रात्री दरोडेखोरी! परभणीच्या ‘भोसले गँग’ला बेड्या

बीड : दिवसा टोपले विकण्याच्या बहाण्याने रेकी करून दरोडा टाकणाऱ्या भोसले गॅंगला बीड गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मारुती दुर्गाजी भोसले, शिवाजी दुर्गाजी भोसले, तानाजी दुर्गाजी भोसले, बबन मारुती भोसले व बळीराम मारुती भोसले अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून एका जीपसह ५ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
या टोळीतील आरोपींच्या पत्नी व इतर महिला या दिवसभर टोपले विकण्याचा बहाणा करून रेकी करायच्या आणि पुरुष रात्रीच्या वेळी दरोडा टाकायचे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथील योगेश्वर हॅचरीज या कंपनीचे सुरक्षा रक्षक विलास जाधव यांना मारहाण करून कंपनीतील ३८० किलो तांब्याची तार घेऊन दरोडेखोर पळाले होते. याप्रकरणी १६ जून रोजी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास करत असताना हा गुन्हा परभणीच्या भोसले गँगने केल्याची टीप गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. बीड पोलीस गेल्या २० दिवसांपासून या टोळीचा शोध घेत होते.
या टोळीतील मारुती आणि शिवाजी हे दोघे परभणीत असल्याचे समजताच बीड पोलिसांचे पथक रवाना झाले. परंतु, पोलीस पोहोचेपर्यंत ते जीपमधून देगलूरला सटकले होते. परभणी ते देगलूरपर्यंत पाठलाग करून बीडच्या गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याच्या साथीदारांनादेखील अटक करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top