माझी हुकूमशाही? मग गप्प का बसलात? शरद पवारांचा अजित पवार गटाला सवाल

नवी दिल्ली – राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे शरद पवार गटाची अंतिम साक्ष झाली. यावेळी शरद पवारांतर्फे युक्तिवाद करणारे अ‍ॅड. देवदत्त कामत म्हणाले की, शरद पवार हे हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवतात असा आरोप करणारे गप्प का बसले? त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक का लढली नाही?
आजच्या सुनावणीला स्वत: शरद पवार, जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण, आमदार भुसारा आणि वकील देवदत्त कामत निवडणूक आयोग कार्यालयात उपस्थित होते. अजित पवार गटाकडून समीर भुजबळ, सुरज चव्हाण व अ‍ॅड. मनिंदर हजर होते. शरद पवार गटाच्या साक्षीचा आज शेवटचा दिवस होता.
शरद पवार गटातर्फे युक्तिवाद करताना अ‍ॅड. देवदत्त कामत म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात कोणतीही फूट नाही. काहीजण म्हणतात की शरद पवार हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवतात. ज्यांचा हा आक्षेप होता त्यांनी शरद पवारांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक का लढली नाही? दिल्लीत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली तेव्हा ते गप्प का राहिले? किंबहुना अध्यक्षपदासाठी शरद पवारांनी जो अर्ज दिला त्यावर अनुमोदक म्हणून अजित पवार यांची सही आहे. हा युक्तिवाद पुढे सुरू राहणार आहे.
सुनावणी संपल्यानंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही तीन-चार मुद्यांवर युक्तिवाद केला. आम्ही सांगितले की, आमच्या पक्षाची घटना आहे आणि आतापर्यंत आम्ही केलेल्या निवडी या संविधानाच्या तरतुदीनुसार केल्या आहेत. त्यावेळी याच लोकांनी या प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी त्याला विरोध केला नव्हता किंवा आक्षेप घेतला नव्हता. आता 20 वर्षांनंतर ते निवडणूकच कशी चुकीची होती ते सांगत आहेत. दुसरा मुद्दा असा की, जी कायदेशीर टेस्ट होणार आहे ती केवळ आमदार आणि मतदारसंघातील मतांच्या संख्येवर असू शकत नाही. तर एकूणच जी संघटनात्मक संख्या असेल, त्यानुसार ही टेस्ट व्हावी.
शरद पवार गटाने अजित पवार गट या सुनावणीवरून पत्रकारांना देत असलेल्या मुलाखतींवरही आक्षेप घेतला. त्यानंतर आयोगाने दोन्ही पक्षांना हे चुकीचे असल्याचे सांगितले.
ठाकरे गटाचा युक्तिवाद
शनिवारी संपणार! मेल सादर

आमदार अपात्रतेबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी झाली. ठाकरे गटाचा युक्तिवाद शनिवारपर्यंत संपणार असून त्यानंतर शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू होणार आहे. आता ठाकरे गटाचे कार्यालय सचिव विजय जोशी यांची साक्ष, शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांची उलटतपासणी आणि शिंदे गटाचे उदय सामंत यांच्यासह पाच आमदारांची साक्ष होणार आहे.
आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांच्यासमोर सुरू असलेल्या सुनावणीच्या आजच्या पाचव्या दिवशी आज शिंदे गटाचे वकील अ‍ॅड. महेश जेठमलांनी यांनी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी केली. आजच्या संपूर्ण दिवसातील सुनावणी ही एकनाथ शिंदे यांना 22 जून 2022 रोजी पाठवलेल्या पत्राभोवती फिरत होती. पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी पाठवलेले पत्र आणि पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर कारवाई करावी लागेल असा त्या पत्राचा मजकूर होता.
यावरूनच सुनील प्रभू यांच्यावर अ‍ॅड. जेठमलानी यांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली.
तुम्ही हे पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिले आहे का आणि त्याचा अर्थ तुम्हाला कोणी मराठीत सांगितला आहे का, असा प्रश्न अ‍ॅड.जेठमलांनी यांनी प्रभू यांना विचारला. त्यावर ’हो, ते पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून आहे. त्याचा मजकूर मला मराठीत समजावून सांगण्यात आला होता,’असे उत्तर प्रभू यांनी दिले. हे पत्र एकनाथ शिंदे यांना लिहिले, मग तुम्ही ते इंग्रजीत का लिहिले, या प्रश्नावर ‘भविष्यात कायदेशीर बाबींसाठी आवश्यकता भासू शकते म्हणून इंग्रजी पत्र लिहिल्याचे’ सुनील प्रभू म्हणाले. त्यावर या पत्राच्या संदर्भात कायदेशीर पेच उद्भवू शकते असे का वाटले, असा आणखी एक प्रश्‍न अ‍ॅड. जेठमलानी यांनी विचारला. या प्रश्नावर प्रभू म्हणाले की, त्यावेळी राजकीय पेच निर्माण झाला होता. तेव्हा भविष्यात कायदेशीर पेच उद्भवू शकतो असे वाटले.
22 जून 2022 रोजीचे पत्र एकनाथ शिंदे यांना कोणत्या माध्यमातून दिले, या जेठमलानींच्या प्रश्नावर, एक-दीड वर्षांपूर्वीचा तपशील मला आठवत नाही. पण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दिले, असे उत्तर प्रभू यांनी दिले. त्यावर व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज सादर करू शकता का, असे अ‍ॅड. जेठमलानी यांनी विचारताच, ‘आता ते सादर करू शकत नाही,’ असे उत्तर प्रभूंनी दिले. ते उद्या सादर करू शकता का, असा प्रश्न जेठमलानी यांनी विचारला. त्यावर प्रभू म्हणाले की, आता मी याबाबत नेमके सांगू शकत नाही. मी प्रयत्न करून बघतो.
जेवणाच्या ब्रेकनंतर कामकाज सुरू होताच एकनाथ शिंदे यांना 22 जूनचे ई मेलव्दारे पत्र पाठवले होते, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. त्यावर कोणत्या ई मेल आयडीवरून पाठवले, कोणी पाठवले, हे पत्र ईमेलव्दारे पाठवल्याचे तुम्हाला कसे कळले. मग तुम्ही सुरवातीला व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवल्याचे का सांगितले असे एकामागोमाग एक प्रश्‍न अ‍ॅड. जेठमलानी यांनी विचारले. त्यावर ‘ते पत्र ईमेलव्दारे पाठवल्याची माहिती मी आताच ऑफिसमध्ये जाऊन घेतली. मी यामध्ये काहीही लपवलेले नाही. खरे तेच सांगितले आहे,’ असे सांगत एकनाथ शिंदे यांना 22 जून रोजी पाठवलेल्या ई मेलची प्रत विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांना सादर केली.
त्यानंतर शिवसेना-भाजपची युती हितासाठी नैतिक आणि तात्विक फायद्यासाठी होती असे शिंदे गटाच्या आमदारांचे म्हणणे होते. तर काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची युती बेकायदेशीर मतदारांचा विश्वासघात करणारी होती असे आमदारांचे म्हणणे होते, असा युक्तिवाद अ‍ॅड. जेठमलांनी यांनी केला त्यावर हे खोटे असल्याचे सुनील प्रभू म्हणाले.
एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांना शिवसेनेच्या संघटनात्मक पदावरून काढून टाकण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकारच नव्हता, असेही अ‍ॅड. जेठमलानी म्हणाले. त्यावर हे खोटे असल्याचे प्रभू म्हणाले. त्यानंतर वेळ संपली. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी उद्या सकाळी 11 वाजता पुढे सुरू होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top