Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा हंगाम आता आपल्या अंतिम टप्प्याकडे कूच करत असून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात अष्टपैलू अभिनेता सागर कारंडे याला घराबाहेर पडावे लागल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, या दुःखातून सावरण्यापूर्वीच बिग बॉसच्या घरात आता ‘पहिला फायनलिस्ट’ ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कलर्स मराठीने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या नवीन प्रोमोमुळे घरात ‘तिकीट टू फिनाले’साठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.
अंतिम सात स्पर्धकांमध्ये वर्चस्वाची लढाई-
१७ सदस्यांपासून सुरू झालेल्या या प्रवासात नंतर चार वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली होती. आतापर्यंत १४ सदस्यांनी या घराचा निरोप घेतला असून, सध्या घरात रेवा कौरासे, अनुश्री माने, राकेश बापट, दिपाली सय्यद, तन्वी कोलते, राखी सावंत आणि विशाल कोटियन हे सात शिलेदार उरले आहेत. या सात जणांपैकी कोणाच्या डोक्यावर मानाचा तुरा खोवला जाणार आणि ‘फिनालेचे तिकीट’ मिळवून थेट अंतिम फेरीत कोण धडक मारणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हंगामाचा दिमाखदार अंतिम सोहळा १९ एप्रिल रोजी पार पडण्याची शक्यता आहे.
‘बीबी कोर्ट’ आणि तन्वी-रेवामधील वाकयुद्ध-
फिनालेच्या शर्यतीत आघाडी घेण्यासाठी बिग बॉसच्या घरात ‘बीबी कोर्ट’ भरवण्यात आले आहे. या विशेष कार्यात तन्वी कोलते आणि रेवा कौरासे यांच्यात थेट कायदेशीर लढाई पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये तन्वीने रेवावर गंभीर आरोप पत्राद्वारे निशाणा साधला आहे. “रेवा ही ‘डबल ढोलकी’ असून ती स्वतःच्या हिमतीवर नव्हे, तर इतरांच्या जिवावर इथपर्यंत पोहोचली आहे,” असा बोचरा वार तन्वीने केला. या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना रेवाने तन्वीच्या खेळावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मला तन्वीचा गेम कुठेच दिसला नाही,” असे रेवा म्हणाली, त्यावर संतप्त झालेल्या तन्वीने “माझ्यामुळेच तू घराची कॅप्टन झाली होतीस,” अशी आठवण करून देत रेवाला सुनावले.
इतर सदस्यांच्या हाती निकालाची दोरी-
तन्वी आणि रेवा यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनंतर आता घरातील इतर पाच सदस्य या प्रकरणाचा निकाल देणार आहेत. फिनालेच्या तिकिटासाठी ही उमेदवारी कोणाला मिळणार, हे या सदस्यांच्या मतांवर अवलंबून असेल. घरातील समीकरणे पाहता, प्रत्येक सदस्य आपला गट आणि रणनीती जपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
‘बिग बॉस मराठी ६’ चा विजेता प्रेक्षकांनी आताच ठरवला? सोशल मीडियावर तन्वी आणि विशालच्या नावाची लाट!
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या हंगामाचा महाअंतिम सोहळा जवळ येत असताना, केवळ घरातील सदस्यांमध्येच नव्हे, तर सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्येही युद्धाची ठिणगी पडली आहे. कलर्स मराठीने नुकताच ‘तिकीट टू फिनाले’चा प्रोमो प्रदर्शित केला आणि क्षणार्धात नेटिझन्सनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला. घरातील सदस्यांचा अधिकृत निकाल लागायचा असला, तरी चाहत्यांनी मात्र आपल्या लाडक्या स्पर्धकाला आताच ‘विजेता’ घोषित करून टाकले आहे.
तन्वी कोलतेच्या पारड्यात चाहत्यांचे वजन-
प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये तन्वी कोलते आणि रेवा कौरासे यांच्यात ‘बीबी कोर्टा’त शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. या वादात बहुतांश प्रेक्षकांनी तन्वीची बाजू घेतल्याचे दिसत आहे. तन्वीचा खेळ हा सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण आणि स्पष्ट राहिला असल्याचा दावा तिचे चाहते करत आहेत. अनेक युझर्सनी “तन्वीच या सीजनची खरी विनर आहे,” अशा आशयाच्या कमेंट्स करून तिला पाठिंबा दर्शवला आहे. तिच्या खेळातील आक्रमकता आणि स्पष्टवक्तेपणा चाहत्यांना भावताना दिसत आहे.
विशाल कोटियनलाही मोठ्या प्रमाणावर समर्थन-
तन्वीसोबतच विशाल कोटियनच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर चांगलीच आघाडी घेतली आहे. विशालची रणनीती आणि त्याचा घरातील वावर प्रेक्षकांना मनोरंजक वाटत आहे. “विशाल हा खरा ‘मास्टरमाइंड’ असून ट्रॉफीवर त्याचेच नाव कोरले जाईल,” असा विश्वास त्याचे समर्थक व्यक्त करत आहेत. तन्वी आणि विशाल यांच्यातच अंतिम लढत होईल, असे भाकीत अनेक प्रेक्षकांनी आताच वर्तवले आहे.
रेवाच्या भूमिकेवर प्रेक्षकांचे प्रश्नचिन्ह-
रेवा कौरासे हिने ‘वाइल्ड कार्ड’ म्हणून घरात प्रवेश केला होता. त्यावेळी तन्वीने तिला मोठ्या बहिणीप्रमाणे सावरले आणि घरात टिकून राहण्यासाठी मदत केली, याची आठवण अनेक प्रेक्षकांनी करून दिली आहे. “ज्या तन्वीने रेवाला प्रत्येक संकटात सांभाळून घेतले, तिच्यावरच रेवा आता उलटली आहे का?” असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत. आता ‘तिकीट टू फिनाले’च्या महत्त्वाच्या टप्प्यावर रेवाने कृतज्ञता दाखवून तन्वीला पाठिंबा द्यायला हवा, अशी भावना अनेक जुन्या प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.











