मुंबई – मिठी नदीतील (Mithi River Scams) गाळ काढण्याच्या कंत्राटात झालेल्या कथित अनियमितता आणि निधीच्या गैरवापराच्या आरोपांवरून सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुंबईत आठ ठिकाणी छापेमारी केली. बनावट सामंजस्य करार सादर करणाऱ्या काही कंत्राटदारांच्या (Contractors)कार्यालयांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहारामुळे मुंबई महापालिकेला सुमारे ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. यापूर्वी या प्रकरणात अभिनेता दिनो मोरियाचीही चौकशी करण्यात आली होती. कंत्राटदारांनी बनावट कागदपत्रे सादर करून पालिकेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याच मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनात शिंदे गट आणि ठाकरे गटात वादही झाला होता. त्यामुळे या कारवाईमागे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा राजकीय हेतू असल्याची चर्चा सुरू आहे.