Ind vs Eng Test: ‘आम्ही कोणाला खूश करण्यासाठी आलेलो नाही…’, हँडशेक वादावर गौतम गंभीचे स्टोक्सला सडेतोड उत्तर

India vs England Test Handshake Controversy

India vs England Test Handshake Controversy: भारत आणि इंग्लंड (India vs England Test) यांच्यातील चौथ्या कसोटी सामना अनिर्णित राहिला. मात्र सामन्याच्या पाचव्या दिवशी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर मोठा ड्रामा (India vs England Test Handshake Controversy) पाहायला मिळाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) 15 षटके शिल्लक असताना सामना अनिर्णित राखण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, त्यावेळी भारताचे रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघेही शतकाच्या उंबरठ्यावर असल्याने भारताने हा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला.

स्टोक्स या निर्णयामुळे नाराज झाला असला तरी, खेळ सुरू राहिला आणि जडेजा तसेच सुंदर या दोघांनीही आपली शतके पूर्ण केली. त्यानंतर सामना संपल्यानंतर स्टोक्सने देखील जडेजा आणि सुंदरशी हस्तांदोलन केले नाही. आता यावर गंभीरने स्टोक्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

गंभीरचे सडेतोड उत्तर

सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने खेळाडुंची पाठराखण करत हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. त्यांनी विचारले, जर कोणी 90 धावांवर आणि दुसरा 85 धावांवर फलंदाजी करत असेल, तर त्यांना शतकाचा हक्क नाही का? जर इंग्लंडचे खेळाडू शतकाच्या जवळ असते, तर त्यांनी मैदान सोडले असते का? नाही. आमच्या खेळाडूंनी ती शतके मिळवली आहेत. आम्ही कोणालाही खूश करण्यासाठी येथे नाही.

गिलचा पाठिंबा

कर्णधार शुभमन गिलनेही या निर्णयाला पाठिंबा दिला. त्याने सांगितले की, जडेजा आणि सुंदर यांना शतक पूर्ण करण्याचा हक्क होता. भारताने 311 धावांनी पिछाडीवरून दुसऱ्या डावात 143 षटकांत 425 धावा केल्या. गिलने 103, केएल राहुलने 90, जडेजाने 107 तर सुंदरने 101 धावा केल्या. सुरुवातीचे दोन गडी शून्यावर बाद झाले तरी मधली फळीने उत्तम खेळ केला.

स्टोक्सने आपल्या कृतीचे केले समर्थन

मँचेस्टरमधील भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या अखेरीस विचित्र ‘हँडशेक’ वादामध्ये सापडलेल्या इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या कृतीचे समर्थन केले आहे.

सामन्यानंतर स्टोक्स म्हणाला, “त्या जडेजा आणि सुंदर यांनी खेळलेली खेळी खूप चांगली होती. भारताची तेव्हाची परिस्थिती पाहता, आम्ही थोडा खेळ खुला केला, तेव्हा ती भागीदारी खूप मोठी होती.नाही वाटत की 80, 90 धावांवर नाबाद राहून बाहेर पडण्यापेक्षा, शंभर धावा करून नाबाद राहून संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात जास्त समाधान मिळेल.

10 अधिक धावा किंवा जे काही असेल, त्याने तुम्ही तुमच्या संघाला अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि शेवटच्या सामन्यापूर्वी संघाला मालिका पराभवापासून वाचवले, हे सत्य बदलणार नाही., असे तो म्हणाला. तो पुढे म्हणाला की, 1 तास बाकी असताना सामना ड्रॉ होणार हे निश्चित होते. त्यामुळे तसा निर्णय घेतला.

दरम्यान, सध्या भारत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. भारताला मालिका अनिर्णित राखायची असेल, तर पुढील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे.