Home / महाराष्ट्र / Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; ठाणे, रायगड, नंदुरबारमध्ये सरी

Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; ठाणे, रायगड, नंदुरबारमध्ये सरी

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवामानात अचानक बदल जाणवू लागला आहे. ठाणे, नंदुरबार आणि रायगड...

By: Team Navakal
Maharashtra Rain
Social + WhatsApp CTA

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवामानात अचानक बदल जाणवू लागला आहे. ठाणे, नंदुरबार आणि रायगड जिल्ह्यांतील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे वातावरण ढगाळ झाले असून, गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेली थंडीचा कडाका जवळपास नाहीसा झाला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि उपनगरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर झाल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. नवी मुंबईतही सकाळच्या सुमारास विविध भागांत पावसाच्या सरी पडल्या. थंडीच्या दिवसांत पावसामुळे हवेतील गारवा काही प्रमाणात वाढल्याचे नागरिकांनी सांगितले. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही अचानक पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

रायगड जिल्ह्यात पहाटे चारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पेण तालुक्यातील जोहे आणि हमरापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांची धावपळ उडाली. या पावसाचा फटका गणपती मूर्ती कारखाने आणि वीटभट्ट्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शहादा शहरासह परिसरात अचानक जोरदार पाऊस पडला असून, जिल्ह्याच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. सोमवारी रात्री झालेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. विशेषतः सातपुडा पट्ट्यातील आंबा आणि कैरी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी मोहरांनी बहरलेली आंब्याची झाडे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर मोहर गळून जमिनीवर पडले आहेत.

याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण होते. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतही अंशतः ढगाळ वातावरण कायम होते.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या