Mumbai Crime : आजकाल एआय (AI) ची जबरदस्त अशी क्रेझ पाहायला मिळते. आणि त्यामुळे वाढलेल्या सर्रास वापरामुळे फसवणुकीचेही अनेक प्रकार उघडकीस येताना दिसत आहेत. त्यातलाच एक धक्कादायक प्रकार मुंबईच्या सीएसएमटी (CSMT) रेल्वे स्थानकावरून समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर सीएसएमटी (CSMT) चॅटजीपीटीचा वापर करून बनावट रेल्वे पास तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा एआय पास तयार करून लोकल ट्रेनने प्रवास केल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाने मुंब्रा ते CSMT दरम्यान प्रवासासाठी एक महिन्याचा बनावट पास तयार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. (fake Railway Pass)
प्रकरण नेमकं काय?
२५ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १२:४५ वाजता भायखळा रेल्वे स्थानकावर नियमित तिकीट तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. तिकीट तपासनीस कुणाल सावरडेकर हे प्लॅटफॉर्म क्रमांक ०१ वरील मुख्य गेटजवळ तिकीट तपासणी करत असताना त्यांनी या तरुणाला तिकीट दाखवण्यास सांगितले.
या तरुनाने आपल्या फोनवर रेल्वे पास दाखवला; मात्र तो अधिकृत असणाऱ्या UTS मोबाइल अॅपवर नसून केवळ छायाचित्र स्वरूपात असल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर त्याला पुढील तपासणीसाठी तिकीट तपासणी कार्यालयात आणले.
वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर हा पास अधिकृत निकषांनुसार नसल्यचे आणि हा पास बनावट असल्याचे स्पष्ट केले. तपासात असे निष्पन्न झाले की, या तरुणाने एका मित्राच्या मार्गदर्शनाखाली चॅटजीपीटीचा वापर करून हा बनावट पास तयार केला होता. या पासवर २४ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीसाठी मुंब्रा ते सीएसएमटी प्रवासाची वैधता दाखवण्यात आली होती .
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी या तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (२) (फसवणूक), ३३६(३) (बनावट कागदपत्रे तयार करणे) आणि ३४०(२) (बनावट इलेक्ट्रॉनिक नोंदींचा वापर) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींन्वये या तरुणावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, बनावट पासवर अधिकृत सील तसेच माहितीचा वापर करून तो खरा असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक तपासणीमध्ये हा पास अधिकृत रेल्वे प्रणालीशी संबंधित नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपीविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे वापरल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील यावेळी रेल्वे पोलिसांनी दिला आहे.
हे देखील वाचा-
नवी मुंबई विमानतळाने घेतली पहिली व्यावसायिक उड्डाणाची झेप; भारतीय विमानवाहतूकीसाठी नवा अध्याय









