Nashik Mayor Election 2026 : नाशिक महानगरपालिकेच्या सत्ताकारणाचे चित्र अखेर स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्रित येत महापालिकेची सत्ता काबीज केली आहे. आज सकाळी महापालिका सभागृहात पार पडलेल्या विशेष निवड प्रक्रियेत भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी, तर शिवसेनेच्या विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या नव्या सत्तासमीकरणामुळे नाशिकच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
निवडणुकीच्या काळात परस्परांविरोधात दंड थोपटणारे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी आता एकाच छताखाली आले आहेत. सुरुवातीला भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने “आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही,” असे विधान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. मात्र, राज्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेअंती युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या तहाच्या सूत्रानुसार, भाजपने महापौरपद आपल्याकडे राखले, तर उपमहापौरपद शिवसेना शिंदे गटाला बहाल केले. उपमहापौरपदासाठी शिवसेनेतून बंटी तिदमे यांचेही नाव चर्चेत होते; मात्र श्रेष्ठींच्या आदेशानंतर विलास शिंदे यांच्या नावावर अंतिम मोहोर उमटवण्यात आली. मतदानापूर्वी भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांसाठी ‘व्हीप’ (अधिकृत आदेश) जारी करून युतीच्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे निर्देश दिले होते.
नाशिकमधील या सत्तास्थापनेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ भाजप आणि शिवसेनाच नव्हे, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनीही या युतीला पाठिंबा दिला आहे. या व्यापक महायुतीमुळे पालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. दुसरीकडे, या सर्व घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. प्रबळ सत्ताधारी गट समोर असताना ठाकरे गट आता सभागृहात प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावेल.
आजच्या निवड प्रक्रियेत नाट्यमय घडामोडींनंतर दोन्ही पदे बिनविरोध निवडून आली. महापौरपदासाठी ठाकरे गटाकडून सीमा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, माघार अर्ज देण्यासाठी त्या स्वतः भाजपच्या उमेदवार हिमगौरी आडके यांच्यासोबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे गेल्या होत्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी “कोणाच्या दबावाखाली माघार घेत आहात का?” असा प्रश्न विचारला असता, सीमा पवार यांनी स्वेच्छेने आणि विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही पदांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली, ज्यामुळे नाशिक महानगरपालिकेत महायुतीच्या नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे.









