Home / Uncategorized / Police Recruitment Beed News : पोलीस भरतीचे वास्तव: पदवीधर आणि अभियंत्यांची शिपाई पदासाठी रांग; बीड व परभणीत हजारो अर्ज

Police Recruitment Beed News : पोलीस भरतीचे वास्तव: पदवीधर आणि अभियंत्यांची शिपाई पदासाठी रांग; बीड व परभणीत हजारो अर्ज

Police Recruitment Beed News : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यातून सुशिक्षित बेरोजगारीचे विदारक...

By: Team Navakal
Police Recruitment Beed News
Social + WhatsApp CTA

Police Recruitment Beed News : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यातून सुशिक्षित बेरोजगारीचे विदारक वास्तव अधोरेखित होत आहे. केवळ बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आवश्यक असलेल्या या पदासाठी उच्चशिक्षित तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. बीड जिल्हा पोलीस दलातील १७४ रिक्त जागांसाठी तब्बल ८,१३४ उमेदवारांनी अर्ज केले असून, यामध्ये अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग), एमबीए आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांचा लक्षणीय सहभाग आहे.

शिक्षणाचा उच्चांक आणि रोजगाराची ओढ-
बीडमधील अर्जांच्या छाननीनंतर असे दिसून आले की, एकूण उमेदवारांपैकी २,६५३ अर्जदार हे पदवीधर आहेत. यामध्ये कला शाखेचे सर्वाधिक १,४२८, विज्ञान शाखेचे ५८२ आणि वाणिज्य शाखेचे ३२१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे, तांत्रिक क्षेत्रातील ४७ अभियंता (Engineering) आणि औषधनिर्माण शास्त्र (Pharmacy) विभागातील १९ उमेदवारांनीही या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. कॉर्पोरेट जगतात मानल्या जाणाऱ्या एमबीए (MBA) पदवीचे १९ उमेदवार आणि ३८८ पदव्युत्तर (Post Graduate) शिक्षण पूर्ण केलेले तरुण पोलीस शिपाई होण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने सरकारी नोकरीच्या सुरक्षिततेसाठी ही स्पर्धा लागल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

पारदर्शक प्रक्रिया आणि कडक शिस्त-
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेतल्या जात आहेत. मैदानी चाचणीदरम्यान ‘डोपिंग’ किंवा उत्तेजित पदार्थांचे सेवन करणाऱ्या उमेदवारांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच, “नोकरी लावून देतो” असे आमिष दाखवणाऱ्या एजंटांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

परभणीत १० हजारांहून अधिक अर्ज-
दुसरीकडे, परभणी जिल्ह्यातही परिस्थिती वेगळी नाही. परभणी पोलीस दलातील ९७ जागांसाठी १०,६७९ अर्जांचा पाऊस पडला आहे. या भरती प्रक्रियेसाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून, संपूर्ण प्रक्रियेवर ८५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. अचूकतेसाठी आर.एफ.आय.डी. (RFID) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. दररोज सरासरी १,००० उमेदवारांची चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बीड येथे घडलेल्या काही अप्रिय घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून परभणीत दोन विशेष वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत, जेणेकरून धावपळीच्या चाचणीदरम्यान उमेदवारांना तातडीची मदत मिळू शकेल.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या