Rajyasabha Election 2026 : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले असून, एप्रिल २०२६ मध्ये रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार असली, तरी सर्वांचे लक्ष महाराष्ट्रातील रिक्त होणाऱ्या ७ जागांकडे लागले आहे. राज्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि महत्त्वाची मानली जात आहे.
भाजपमध्ये इच्छुकांची मांदियाळी आणि ‘निष्ठावंत’ विरुद्ध ‘आयाराम’-
राज्यातील विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागांसाठी पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र, यावेळी भाजपमध्ये अंतर्गत स्तरावर एक वेगळा सूर उमटताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना (आयाराम) राज्यसभा किंवा विधान परिषदेवर वारंवार संधी देण्यात आली. यामुळे पक्षाच्या मूळ विचारधारेशी जोडले गेलेले ‘निष्ठावंत’ कार्यकर्ते काहीसे नाराज आहेत. यंदा तरी बाहेरील नेत्यांऐवजी पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार व्हावा, अशी मागणी एका गटाकडून आक्रमकपणे केली जात आहे.
सध्या भाजपच्या गोटातून काही प्रमुख नावे चर्चेत आहेत-
१.विनोद तावडे: पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे नाव.
२.रामदास आठवले: केंद्रीय मंत्री आणि मित्रपक्षाचे प्रमुख चेहरा.
३.विजया रहाटकर: महिला नेतृत्वाचे प्रतिनिधित्व.
४.डॉ. भागवत कराड: माजी केंद्रीय राज्यमंत्री.
५.धैर्यशील पाटील: स्थानिक पातळीवरील प्रभावी नेतृत्व.
निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम-
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या निवडणुकीची प्रक्रिया मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच वेग घेणार आहे. यातील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत-
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत: ५ मार्च २०२६
अर्जांची छाननी: ६ मार्च २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत: ९ मार्च २०२६ पर्यंत
मतदान प्रक्रिया: १६ मार्च २०२६ (सकाळी ९:०० ते दुपारी ४:००)
निकाल: १६ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर त्वरित निकाल घोषित केले जातील.
महाराष्ट्रातील या ७ जागांच्या निकालावर राज्यातील आगामी राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंकडून रणनीती आखली जात असून, भाजप आपल्या कोट्यातील जागांवर ‘निष्ठावंतांना’ संधी देऊन कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करणार की पुन्हा नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (Maharashtra Rajyasabha Election 2026)
शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई)
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)













