Srinagar News : आई म्हणजे केवळ जन्मदात्री नाही, तर हृदयाच्या खोलात असणाऱ्या अनंत मायेची प्रतिकृती आहे. हीच माया सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका अत्यंत हृदयस्पर्शी दृश्यात स्पष्ट दिसते. थंडीत, आपल्या शहीद लेकाच्या पुतळ्याजवळ एक माऊली जाऊन त्याला उबदार ठेवण्याच्या हेतूने पांघरूण ओढते. लेक डोळ्यांसमोर असो किंवा त्याचा पुतळा, मातेच्या काळजात असलेली माया आणि काळजातील ओलावा कधीच कमी होत नाही. या साध्या पण भावनिक कृतीने पाहणाऱ्यांचे हृदय जिंकले असून, अनेकांना डोळ्यात पाणी आणले. सोशल मीडियावर या व्हिडिओच्या प्रचंड पसंतीमुळे लोकांना मातृस्नेहाची खरी ताकद आणि शहीदांच्या कुटुंबीयांवरील मायेचा अनमोल भाव अनुभवायला मिळतो.
सीमा सुरक्षा दलाचे (BSF) शहीद जवान गुरनाम सिंह यांच्या शौर्याची आणि मातृस्नेहाची एक अत्यंत भावनिक प्रतिमा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना गुरनाम सिंह यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती; त्यांनी भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या या शौर्याची आठवण म्हणून चंदीगडमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. थंडीत, आपल्या शहीद मुलाच्या पुतळ्यावर मायेचे पांघरूण ओढत त्यांच्या आईची ही हृदयस्पर्शी कृती पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. आईची ममता आणि शहीद मुलावर असलेला अभूतपूर्व प्रेमाचा अनुभव या साध्या पण अत्यंत भावनिक कृतीतून स्पष्ट दिसतो. या दृश्याने फक्त शहीदांच्या कुटुंबीयांचा गौरव नाही तर सर्व भारतीयांच्या हृदयात मातृस्नेहाची आणि देशभक्तीची खरी ताकद जागवली आहे.
तुझा वाघ घाबरणारा नाही
शहीद जवान गुरनाम सिंह यांच्या आई जसवंत कौर यांनी सांगितले की, शहीद होण्यापूर्वी गुरनामने घरी फोन करून सांगितले होते की त्याने दहशतवाद्यांना ठार केले आहे. स्वतःची काळजी घेण्यास सांगितले असता तो आपले धैर्य दाखवत म्हणायचा, “तुझा वाघ घाबरणार नाही.” त्याची धाडस आणि देशभक्ती इतकी प्रगल्भ होती की तो अनेकदा म्हणायचा, “मी शहीद झालो तर गावाच्या चौकात माझा पुतळा उभारा, जो संपूर्ण जग बघेल.” २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये घुसखोरी रोखताना आपल्या प्राणांची आहुती देणारा गुरनाम सिंह भारतमातेच्या रक्षणासाठी शहीद झाला. त्यांच्या शौर्याची आठवण म्हणून चंदीगडमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
सीमा सुरक्षा दलाचे शहीद जवान गुरनाम सिंह यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाची आणि संघर्षाची प्रत्यक्ष झलक त्यांच्या भावनिक प्रतिक्रियेतून दिसून येते. वडील कुलबीरसिंग शांत उभे राहून पुतळ्याकडे बघत होते; त्यांच्या नजरेत पित्याचा अभिमान आणि तुटलेल्या हृदयाचे वेदनादायी दुःख दोन्ही स्पष्ट जाणवत होते. आई जसवंत कौर म्हणाल्या की, “ज्या चौकात गुरनामचा पुतळा उभा आहे, तो खूप छोटा आहे. अनेकदा गाड्या तिथून जाताना स्मारकाला धक्का लागतो, तेव्हा माझे काळीज तुटते. वडील कुलबीरसिंग यांनी आपले दुःख मोकळे करत सांगितले की, गुरनाम शहीद झाल्यानंतर अनेक आश्वासने देण्यात आली होती; बीएसएफने
माझ्या मुलीला नोकरी दिली, आता तिचे लग्न झाले आहे. पण जम्मू-काश्मीर सरकारकडून काहीही मिळालेले नाही. पाच लाख रुपयांचे आश्वासनही अजून अपूर्ण आहे. त्यातून त्यांच्या जीवनातील आर्थिक संघर्ष आणि शेतीवाडी नसल्यामुळे खाण्यासाठीही साधनसामग्री नसल्याचे त्यांनी व्यक्त केले. या अनुभवातून शहीदांच्या कुटुंबीयांचे दु:ख, देशभक्तीवरील त्यांचा अभिमान आणि शासनकडून मिळणाऱ्या सहाय्याच्या अपुरेपणाचे वास्तव समोर येते.
हे देखील वाचा – Ancient Shipwreck : समुद्रतळापाशी सापडले ६ शतकांपूर्वीचे महाकाय जहाज; १५व्या शतकातील कॉग जहाजाची झलक









