हैद्राबाद- तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात पाटण चेरू इथल्या सिगाची केमिकल्स या कारखान्यात (Telangana chemical factory blast) काल झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा ३५ वर पोहोचला आहे. आज सकाळपासून या कारखान्याचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत ३१ मृतदेह हाती लागले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी (CM A. Revanth Reddy) यांनीही आज घटनास्थळाला भेट दिली.
या स्फोटात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील अनेक मृतदेह तर इतके छिन्न-विछिन्न झाले होते की त्यांची ओळख डीएनएमुळेच शक्य झाल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. ज्या सिगाची कारखान्यात हा स्फोट झाला, त्या ठिकाणी औषधांची निर्मिती होत होती. रासायनिक प्रक्रियेमुळे हा स्फोट झाला असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. काही मृतदेह अद्यापही ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यताही पोलीस व मदतकार्य करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.