कवठेमहांकाळमध्ये राजकीय राडा! माजी उपनगराध्यक्षांना मारहाण

सांगली- भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी समर्थकासह कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्षांच्या घरात घुसून मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली. मात्र, मारहाण झाल्याची कबुली देत आपल्या स्वीय सहायकाला तिघांनी काल रात्री मारहाण केल्याचा दावाही पाटील यांनी केला. या घटनेप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केली.
कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी केलेल्या तक्रारीनुसार पाटील यांनी आपल्या समर्थकासह घरात घुसून मारहाण केली. तसेच घरातील महिला आणि मुलांनाही मारहाण केल्याचा दावा मुल्ला यांनी केला. मारहाणीपासून वाचविण्यासाठी पुढे आलेल्या ७६ वर्षाच्या आईलाही पाटील यांनी ढकलून दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली. दरम्यान, या घटनेबाबत पाटील यांनी सांगितले, शुक्रवारी रात्री स्वीय सहायक खंडू होवाळे यांना मुल्ला, बाळासाहेब पाटील व पिंटू कोळेकर या तिघांनी मारहाण केली होती. ही माहिती मिळताच आज विचारणा करण्यासाठी मी मुल्ला यांच्या घरी गेलो होतो. मात्र, त्यांची भाषा अर्वाच्च व ताणून मारण्याची होती. यामुळे संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने दोन थोबाडीत लगावल्या.