मुंबई- मालाड पूर्वेमध्ये रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी मारहाण करुन मनसे कार्यकर्त्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. आकाश माईन(२७),असे या मृत मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे.
आकाश माईन हे दसरानिमित्त काल संध्याकाळी नवीन गाडी घेण्यासाठी मालाड रेल्वे स्टेशनजवळ गेले होते. त्यावेळी स्टेशनजवळ गाडीला रिक्षावाल्याने कट मारल्यामुळे आकाश आकाश माईन आणि रिक्षावाल्यात बाचाबाची झाली. त्यावेळी रिक्षाचालक आणि त्यांचे मित्र फेरीवाल्यांनी आकाश माईनला बेदम मारहाण केली. त्यात आकाश माईन गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री १२ वाजता आकाश माईनचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला.

 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								







